निवेदनात म्हटले आहे की, लोहारा पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गावात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या व्यवसायांवर शासनाने निर्बंध घातले आहेत. परंतु, बहुतांश ठिकाणी अवैध दारू विक्री, जुगार, मटका आदी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून येत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केलेली असतानाही शेजारील कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. अवैध दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. महिलांवरील झालेल्या अन्यायाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात लोक आले तर तेथील अधिकारी ठाण्याचा संबंध नसलेल्या खासगी व्यक्तीकडे पाठवित असल्याच्या तक्रारी असल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध धंदे तत्काळ बंद करावेत, तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलीस ठाण्यातच न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, नागन्ना वकील, जालिंदर कोकणे, शब्बीर गवंडी, नाना पाटील, प्रकाश भगत, नवाज सय्यद, हाजी बाबा शेख, बहादूर मोमीन, स्वप्नील माटे, राजेंद्र कदम, मनोज देशपांडे, तिरुपती चव्हाण आदी उपस्थित होते.
अवैध धंदे बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:20 AM