उस्मानाबाद : येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी मोदी सरकारला थँक यू म्हणणारे बॅनर शहरातील चौकाचौकांत लावण्यात आले आहेत. यावर इंधन दरवाढ, बेरोजगारीसह इतरही मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.
इंधन दरवाढीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी पक्षांनी केंद्राने कर कमी करावा, अशी मागणी करीत आंदोलने केली आहेत. तर भाजपानेही राज्याने जास्तीचा कर लावला असून, तो कमी केल्यास इंधनाचे दर आटोक्यात येतील, असा पलटवार केला आहे. यासोबतच कोरोनानंतर बेरोजगारी तसेच महागाईही वाढली आहे. नेमके हेच मुद्दे घेऊन केंद्र सरकारला या परिस्थितीला जबाबदार धरीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हटके आंदोलन करण्यात आले.
उस्मानाबाद शहरातील प्रमुख चौकांमध्ये पक्षाच्या वतीने बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यावर पेट्रोलचे दर शंभरीपार, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेसुमार वाढलेली बेरोजगारी, आकाशाला भिडलेली महागाई, सब तरफ से पड रही मार... थँक यू मोदी सरकार... असा मजकूर प्रकाशित करून उपहासात्मक निषेध नोंदविण्यात आला आहे. हे बॅनर ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधत असून, त्यांची चर्चाही जोरात रंगली आहे.
150321\15osm_1_15032021_41.jpg
राष्ट्रवादी काँग्रेसने महागाई, बेरोजगारीस केंद्र सरकारला जबाबदार ठरवीत उपहासात्मक निषेध नोंदविणारे बॅनर्स उस्मानाबादेतील प्रमुख चौकांत लावले आहेत.