उस्मानाबाद/भूम -ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी (२०१९) राष्ट्रवादीला धक्का देत शिवसेना उमेदवार आ. तानाजी सावंत यांच्या प्रचारात उतरलेले भूम पालिकेतील गटनेते संजय गाढवे यांना आता त्यांच्याच गडामध्ये घेरण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. गाढवे यांचे कट्टर विराेधक असलेले जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले जाणार आहे. स्वत: कांबळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसे संकेतही दिले आहेत. या माध्यमातून राष्ट्रवादीला एक आक्रमक चेहरा आणि तरुणांची फाैज मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल माेटे यांचे कट्टर समर्थक म्हणून भूम पालिकेचे गटनेते संजय गाढवे यांची एकेकाळी ओळख हाेती. त्यांची शहरावर मजबूत पकड असल्याने नगर पालिका, विधानसभा की लाेकसभा असाे. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना माेठे मताधिक्य मिळत हाेते. त्यामुळे पक्षश्रेष्ठीही संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने खासकरून शहरात लक्ष घालत नसत. त्यामुळे राष्ट्रवादी म्हटले की संजय गाढवे यांचे नाव घेतले जात असे; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गाढवे यांनी निश्चिंत असलेल्या राष्ट्रवादीला जाेरदार धक्का देत शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या प्रचारात उतरले. ही घडामाेड ऐनवेळी घडल्याने राष्ट्रवादीला डॅमेजकंट्राेल करण्यासाठीही फारशी संधी मिळाली नाही. परिणामी कधी नव्हे ते सेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रा. सावंत यांना पाच हजारांचे मताधिक्य मिळाले. गाढवेंच्या या धक्कातंत्रामुळे दुखावलेली राष्ट्रवादी गाढवेंना त्यांच्याच गडामध्ये घेरण्यासाठी आक्रमक व साेबत तरुणांची फळी असणारे सुरेश कांबळे यांच्या मनगटावर घड्याळ बांधण्याच्या तयारीत हाेती. राष्ट्रवादीचे हे प्रयत्न आता फळास आले आहेत. भूम येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात कांबळे यांनी तसे संकेत दिले हाेते. त्यानुसार १६ सप्टेंबर राेजी मुंबई येथे ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते प्रवेश करणार आहेत. कांबळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला भूम शहरासाेबतच गावाेगावी मल्हार आर्मी व जय हनुमान ग्रुपच्या माध्यमातून तरुणांच्या फाैजेचे बळ मिळणार, हे निश्चित !
चाैकट...
स्थानिक निवडणुकांतही वाढेल बळ...
सुरेश कांबळे यांनी २०१९ ची विधानसभा वंचित बहुजन विकास आघाडीकडून लढविली हाेती. ऐनवेळी आखाड्यात उडी घेऊनही त्यांनी तब्बल २८ हजारांवर मतदान घेतले हाेते. मल्हार आर्मी, जय हनुमान ग्रुपचे गावाेगावी असलेल्या संघटनांचा त्यांना फायदा झाला. त्यांच्या याच संघटनाचा ताेंडावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला माेठा लाभ हाेऊ शकताे.
काेट...
ग्रामीण भागाच्या विकासाची जान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाेबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेसह नगर पालिका निवडणूकही ताेंडावर आली आहे. या निवडणुकांत पक्ष जाे जबाबदारी देईल, ती सर्वांना साेबत घेऊन पार पाडू. पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणणे, हेच आम्हा सर्वांचे उद्दिष्ट असेल.
-सुरेश कांबळे, संस्थापक अध्यक्ष, जय हनुमान ग्रुप.
भूम नगर पालिका निवडणुकीत पक्ष जी काेणती जबाबदारी देईल, ती पक्षातील सर्वांना साेबत घेऊन ताकदीने पार पाडू. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणणे, हेच आमचे मुख्य लक्ष असेल.
.................