उस्मानाबाद : जिल्ह्यातील काही भागात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरात सुमारे १३० जण अडकून पडले होते़ बुधवारी सायंकाळी सुरू झालेले बचावकार्य गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाले़ यात सर्वांची सुटका करण्यात आली़ एनडीआरएफचे पथक वेळेत दाखल झाल्याने एअरलिफ्टिंग टळले़
उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाला़ यामुळे उमरगा, लोहारा व परंडा तालुक्यातील १३० नागरिक शेती, शेतवस्त्यांवर अडकून पडले़ याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी परिस्थितीचा आढावा घेत लातूर व उस्मानाबाद येथील बचाव पथकास पाचारण केले़ त्यांच्या माध्यमातून बुधवारी रात्रीपर्यंत १६ जणांना पुरातून बाहेर काढण्यात आले होते़
मात्र, उमरगा तालुक्यातील कदेर येथील दोघे व परंडा तालुक्यातील वडनेर व सोनटक्के वस्ती (नालगाव) येथे अनुक्रमे ९५ व १७ नागरिक अडकून पडले होते़ बचाव पथकाचे प्रयत्न पुरेसे ठरत नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांनी एनडीआरएफच्या बचाव पथकास पाचारण केले़ तसेच याठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे नागरिकांना वाचविण्यासाठीची परवानगी मिळवून घेतली़ त्यातच एनडीआरएफचे बचाव पथक गुरुवारी दुपारी परंडा तालुक्यात दाखल झाले़ त्यांनी वरील ठिकाणच्या सर्वच नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढले़