जिल्ह्यात गतवर्षी मे-जून महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले होते. जुलै ते सप्टेंबर महिन्यांत प्रतिदिन १५० ते २०० रुग्णांची नोंद होत होती. रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये अधिगृहीत करण्यात आली होती. शिवाय, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी ५८ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यानंतर अनेक रुग्णांना गृहविलगीकरणाचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे कोविड सेंटरही बंद करण्यात आले होते. मात्र, ज्या रुग्णांच्या घरी स्वतंत्र खोली, स्वच्छतागृहाची सोय नाही. तसेच लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती घरात असल्यानंतर त्यांच्याकरिता कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्यात आले होते. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोविड केअर सेंटर सुरू झाले आहेत. संसर्ग रोखण्याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संपर्कात इतर निरोगी व्यक्ती येऊ नये, यासाठी केंद्राच्या बाहेर पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत. कुटुंबातील व्यक्तीला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दाखल झालेली तारीख प्रवेशद्वारावरच आरोग्य कर्मचारी नोंदवून घेत आहेत. रुग्ण उपचाराअंती बरा झाल्यानंतर त्याला आणण्यासाठी गेलेल्या नातेवाकांना गेटच्या बाहेरच थांबविले जात असल्याचे पाहवयास मिळाले.
गेटवर कर्मचाऱ्यांचा पहारा
शहरातील वैराग रोड परिसरातील मागासवर्गीय मुलीची शासकीय निवासी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्राची एकूण १०० रुग्णांची क्षमता आहे. सध्या या केंद्रात ४६ रुग्ण दाखल असून, इतरांना या केंद्रात प्रवेश दिला जात नाही. इतर व्यक्ती आतमध्ये येऊ नये, यासाठी प्रवेशद्वारावरच सुरक्षा कर्मचारी असतात. शिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी लक्ष ठेवून असतात.
गेट असते बंद
उमरगा येथील ईदगाह फंक्शन हॉल कोविड केअर सेंटरमध्ये सध्या २० रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी इतर व्यक्तींना प्रवेश दिला जात नाही. रुग्णांव्यतिरिक्त इतर व्यक्ती आतमध्ये येऊ नये, यासाठी या सेंटरचे गेट बंद असते. गेटच्या आत डॉक्टर, कर्मचारी थांबतात.
कोट...
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेले १२ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रावर डॉक्टर, परिचारिकांच्या ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतील असेच रुग्ण या केंद्रात ठेवण्यात येत आहेत.
-डॉ. हनुमंत वडगावे,