एकुरगा येथील राम नरसिंग काटगावे याने २९ जानेवारीला सायंकाळी आपल्या वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, ते त्यांनी न दिल्याने राम काटगावे याने वडिलांना शिवीगाळ करत तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर त्याने थेट भाऊ विजयकुमार यांचे शेत गाठत तेथे रचून ठेवलेली तुरीची गंजीच पेटवून दिली. या आगीत संपूर्ण तूर जळून खाक झाली. त्यामुळे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार विजयकुमार काटगावे यांनी पोलिसांकडे दिली. त्यानुसार आरोपी राम काटगावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कडब्याची गंजी पेटवली...
मागील भांडणावरुन एकाने कडब्याची गंजी पेटविल्याचा प्रकार उमरगा तालुक्यातील गुरुवाडी येथे घडला आहे. गुरुवाडी येथील शिवाजी विठोबा गायकवाड व माधव राम गायकवाड यांच्यात भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून माधव गायकवाड याने ३० जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी गायकवाड यांच्या शेतातील ३ हजार पेंढ्या असलेली कडब्याची गंजीच जाळून टाकली. याबाबत सोमवारी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार उमरगा ठाण्यात माधव गायकवाड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.