कळंब... कोरोना महामारीत रूग्णांच्या मदतीसाठी पुढ आलेल्या कळंब येथील ऑक्सिजन ग्रूपची आजवर शंभरावर रूग्णांना तर मदत झाली आहेच शिवाय 'ना नफा, ना तोटा' तत्वावर या ग्रूपच्या दोन ऑक्सीजनयुक्त ॲम्बुलन्स रस्त्यावर धावत आहेत.
कोरोनाचा मार्च महिन्यात प्रकोप वाढत होता. दिवसेंदिवस स्थिती हाताबाहेर जात होती. बेड, ऑक्सीजन, रूग्णवाहिका अशी स्थापित आरोग्य व्यवस्था वाढत्या व गंभिर रूग्णांच्या तुलनेत तोकडी ठरत होती.यामुळे अनेक रूग्ण घाबरून जात होते तर नातेवाईक हतबल होताना दिसून येत होते.
या गंभिर स्थितीत कायम समाजभान जपणाऱ्या अकीब पटेल, चेतन कात्रे, निलेश होनराव, हर्षद अंबुरे या चौकडीने तातडीने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकल कळंबकर’ म्हणत सोशल मीडियावरून साद घातली. यास स्थानिक लोकांसह परदेशातीलही एकाची मदत झाली.यातून बघता बघता एक लाख ७८ रूपयाची जमापूंजी संकलित झाली.
यामधून मग तातडीने तीन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर व एक बायपॅप मशीन कळंबकराना उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे काम करणार्या तरूणांची उमेद वाढली. मग पुढे या चौघांच्या हात-हात घालण्यासाठी अशोक काटे, सुशिल तिर्थकर, सुमित बलदोटा, विशाल पुरेकर पुढाकार घेतला अन् अनेकांच्या मदतीला पडलेला 'ऑक्सिजन ग्रुप' आकारास आला.
मागच्या काही दिवसात जवळपास १२० रूग्णांना या ग्रुपने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आहे. यात ना नफा, ना तोटा तत्वावर केवळ दोन हजारात ऊस्मानाबाद, बार्शी, अंबाजोगाई येथे ऑक्सिजनयुक्त रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जात आहे.या दोन्ही रूग्णवाहिका अहोरात्र रस्त्यावर धावत आहेत. यापैकी एक रूग्णवाहिका तुळजाई प्रतिष्ठानचे शहाजी चव्हाण यांनी उपलब्ध करून दिली होती.
चौकट...
अन् आजीच्या स्मृती जपल्या...
ऑक्सिजन ग्रुपचे तरूण सदस्य चेतन बजरंगराव कात्रे या कठीण काळात तन, मन, धनाने लोकांच्या कामी येत आहेत. त्यांनी आपल्या आजी स्व. यमुनाबाई घुले यांच्या स्मृती जपत ना नफा, तोटा तत्वावरील अत्याधुनिक रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. यासह दोन्ही चालकांना आरोग्य विम्याचे कवच दिले आहे. सदर रूग्णवाहिका कायमस्वरूपी कळंब व परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. याशिवाय एखाद्या असह्य व्यक्तींस आर्थिक सहकार्य करण्यासाठी ही कात्रे पुढाकार घेत आहेत.