मुंबई - 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून राज्यात गदारोळ माजला होता. या पुस्तकाच्या लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यानंतर, महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि शिवभक्तांकडून लेखक गोयल यांचा निषेध नोंदविण्यात आला होता. मात्र, आता, भाजपाच्या एका खासदाराने अमित शहांची तुलना चक्क सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी केली आहे.
भाजपाखासदार तेजस्वी सूर्या यांनी गृहमंत्री अमित शहांना एक पेटींग फोटो भेट दिला आहे. त्यामध्ये, सरदार वल्लभभाई पटेल यांचा आणि अमित शहांचा अर्धा-अर्धा फोटो दिसत आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. ''युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्याच्या कुटील कारस्थानानंतर आता भारताचे पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्याशी अमित शहा यांची तुलना करण्याचे धाडस केवळ अंधभक्तच नाही तर भाजपाच्या अनुयायी खासदारांकडूनही होत आहे'', असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
दरम्यान, आज के शिवाजी - नरेंद्र मोदी या पुस्तकातील वादात, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता भाजपवासी झालेले छत्रपती उदयनराजे यांच्यासह संभाजी राजे, शिवेंद्रसिंहराजे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे हे शांत झालं अस वाटत असताना भाजपच्या माजी आमदाराने पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाजारांचा सन्मान असल्याची मुक्तफळे भाजप नेत्यांने उधळली होती. त्यामुळे, आता हा नवीन वाद उफाळण्याची शक्यता आहे.