तुळजापूर : सोमवारी केंद्रीय पथकाने तालुक्यातील आपसिंगा व कात्री शिवारात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ‘साहेब, न भरून येणारे नुकसान झाले आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या मदतीत काहीच होणार नाही. केंद्राकडूनही काही मदत मिळतेय का पाहा’, अशी अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली. यावेळी केंद्रीय पथकाने शेतात फिरून, शेतकऱ्यांना प्रश्न विचारून प्रत्यक्ष नुकसानीची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकसानीचे स्वरूप समजावून सांगितले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, तालुका कृषी अधिकारी एन. टी. गायकवाड, जलसंधारण अधिकारी महादेव आदटराव, लघु पाटबंधारे विभागाचे गजानन होळकर, कृषी सहायक नवनाथ आलमले, मंडळ कृषी अधिकारी अनिल पवार, ग्रामसेवक चैतन्य गोरे, सरपंच गोरे, ग्रा. पं. सदस्य आमीर शेख, योगेश रोकडे आदींची उपस्थिती होती.
पथकाने आपसिंगा येथे अर्चना युवराज पाटील यांच्या शेतातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी केली. यावेळी याच जमिनीमध्ये लगतच्या ओढ्याच्या प्रवाहाने वाहून आलेले मोठमोठे दगड, धोंडे वावरात दिसत होते. पाण्याची विहीरही भुईसपाट झाली आहे. त्यामुळे जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
चौकट...
सोयबीन पावसाने काळे पडले होते. ते विकायला बाजार समितीमध्ये घेऊन गेलो तर तेथे विकत घेतले गेले नाही. गाळाने विहीर बुजली गेली आहे. कांदा काढणीचे दिवस सुरू झाले आहेत. तरीही कांद्याची वाढ होत नाही, अशी परिस्थिती झाली आहे, अशी व्यथा कात्री येथील शेतकरी बलभीम जमदाडे यांनी यावेळी मांडली.
या पथकाने नेताजी जमदाडे यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूर्ण बाग पाण्यामध्ये राहिल्यामुळे द्राक्ष घडाची वाढ होत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले.