कळंब : रहिवासी भागात दुकान टाकून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना कळंब महसूल प्रशासनाने अकृषी कर भरण्याच्या नोटिसा नुकत्याच जारी केल्या आहेत. त्यामुळे कळंबमधील नागरी वस्तीतील व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. कळंब शहरातील विविध नागरी भागांत अनेक लहान-मोठे व्यावसायिक व्यापार करतात. त्यांची जागा निवासी प्रयोजनासाठी असल्याने ते पालिकेकडे कराचा भरणा करीत आहेत; परंतु निवासी प्रयोजनासाठी असलेल्या जागेचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याने महसूल विभागाने शहरात अशा दुकानांचा सर्व्हे केला. अशी सुमारे चारशेवर दुकाने आढळून आली. याबाबतचा अहवाल तलाठी कार्यालयाने तहसीलदार मंजूषा लटपटे यांच्याकडे पाठविला. तहसीलदारांनी याची गांभीर्याने दखल घेऊन अहवालातील नमूद व्यापाऱ्यांना अकृषी कर भरा, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल, अशी नोटीस संबंधितांना बजावली आहे.
यामध्ये नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या दुकान गाळ्यातील, तसेच भूखंडावरील व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा समावेश नाही. नागरी भागात व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या दुकानाच्या क्षेत्रानुसार अकृषी कर आकारण्यात आला असल्याने काहींचा हा कर हजाराच्या घरात गेला आहे. कोरोना काळात विविध संकटांना तोंड देत दुकानदारी चालवणाऱ्या अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना आता आणखी एक आर्थिक भार सोसावा लागणार आहे.
कोट...
निवासी भागातील जागेचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्याचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये चारशेवर अशा दुकानांची माहिती समोर आली. त्यामुळे असा व्यावसायिक वापर करणाऱ्या मंडळींना त्याचा अकृषी कर भरावा लागेल. त्यानुषंगाने महसूल विभागाने शहरातील संबंधितांना नोटिसा देऊन कर भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. हा कर नियमानुसारच आहे व तो भरावा लागेल.
-मंजूषा लटपटे, तहसीलदार
रहिवासी भागात व्यापार करणारे व्यापारी छोटे व्यापारी आहेत. अनेकांनी जोडउद्योग म्हणून छोटी दुकाने घराच्या एका खोलीत चालू केली आहेत. त्यातून त्यांची कमाईच किती होते, हा संशोधनाचा विषय आहे. अशा मंडळींना व्यापारी ठरवून पाठविण्यात आलेल्या नोटिसा परत घेण्यासंदर्भात वरिष्ठांकडे दाद मागू.
-शिवाजी कराळे, माजी नगरसेवक