उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आधी ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी दिलेली असताना बुधवारपासून ही अटही रद्द करण्यात आली आहे. हॉटेलधून आता यापुढे केवळ पार्सल घेऊन जाण्यासच मुभा असणार आहे.
कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून पन्नाशीपार येत आहे. या अनुषंगाने निर्बंध आणखी कठोर करण्यात येत आहेत. यापूर्वी फूड कोर्ट, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, उपाहारगृहे यांना ५० ग्राहकांनाच सेवा देण्यास मुभा देण्यात आली होती. सोमवारी काढण्यात आलेल्या नव्या आदेशाद्वारे ही मुभाही आता संपुष्टात आली आहे. या ठिकाणी स्वयंपाकगृह सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, आत ग्राहकांना बसवून घेऊन कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नाही. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत पार्सल सेवा देता येणार आहे. निवासी हॉटेल्स (लॉज) असल्यास त्यांनाही केवळ तेथे निवासास असलेल्या व्यक्तींनाच अन्नसेवा देता येणार आहे. तीही रूम सर्व्हिसद्वारेच. बारमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत केवळ पार्सल सेवा देता येईल. दरम्यान, राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असणा-या ढाब्यांना मात्र २४ तास परवानगी असेल. परंतु या ठिकाणीही एकावेळी क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच सेवा देता येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी काढले आहेत.