भूम (जि. उस्मानाबाद) - अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा महसूल मंडळाचे पथक दुचाकीवरून पाठलाग करीत हाेते. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून राेखण्याचा प्रयत्न केला असता, वाळू माफियाने ट्रॅक्टर अंगावर घातला (Sand mafia hit tractor on revenue squad ) . या घटनेत तलाठी तसेच मंडळ अधिकारी जखमी झाले. ही धक्कादायक घटना भूमलगतच्या नदीपात्रात शुक्रवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अवैध गाैण खनिज उत्खनन राेखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलदार यांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे हे पथक गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चिंचपूर येथील नदीपात्रात उतरले. यावेळी तिथे वाळूने भरलेले एक टिप्पर आढळून आले. येथील कारवाई सुरू असतानाच तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांना भूमलगतच्या नदीपात्रातही अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू असल्याची खबर मिळाली. कारवाई पूर्ण करून थाेडाही विलंब न करता पथक रवाना झाले. महसूलचे पथक नदीपात्रात उतरल्याची खबर लागताच वाळू माफियांनी ट्रक्टर दामटण्यास सुरूवात केली. त्यावर तहसीलदार श्रृंगारे यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. महसूलचे पथक आपला पाठलाग करीत असल्याचे पाहून वाळू माफियाने गती वाढवून ट्रॅक्टर पाणंद रस्त्याने भूम-चिंचपूर रस्त्यावर आणला. यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दुचाकीवर स्वार हाेत ट्रॅक्टरचा पाठलाग केला.
ट्रॅक्टर टप्प्यात येताच, त्यांनी ओव्हरटेक केले असता, संबंधित वाळू माफियाने दुचाकीवर ट्रॅक्टर घातला. यात सुकटा सज्जाचे तलाठी लक्ष्मण कांबळे, भूम मंडळ अधिकारी शिवाजी पाटील हे जखमी झाले आहेत. यानंतर चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर गवताळ बांधावर नेऊन पलटी केला. पथकातील अन्य सदस्य ट्रॅक्टरजवळ जाईपर्यंत चालक पसार झाला. यानंतर जखमींना तातडीने भूम ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पथकाने हा ट्रॅक्टरसह जवळपास सहा ब्रास वाळू जप्त केली. कारवाईतील ट्रॅक्टर तसेच टिप्पर भूम पाेलीस ठाण्यात लावण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या पथकाने केली. पथकात नायब तहसीलदार पाटील, पी. व्ही. सावंत, पी. आर. राठोड, मंडळ अधिकारी संजय स्वामी, एस. एस. पाटील, तलाठी लक्ष्मण कांबळे, निळकंठ केदार, सचिन वाघमारे यांचा समावेश हाेता.