उस्मानाबाद : कोरोनापासून बचावासाठी अजूनही पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्णांची संख्या मोठ्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या एका आठवड्यात ६७५ रुग्ण आढळून आले आहेत. वाढीचा हा वेग फेब्रुवारीच्या तुलनेत सातपट अधिक आहे. यामुळे एकेक निर्बंध आता वाढीस लागले असून, संचारबंदीची वेळही रात्री ९ च्या ऐवजी सायंकाळी ७ पासूनच करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती वरचेवर विदारक होत चालली आहे. बाधित आढळून येण्याची संख्या लक्षात घेतल्यास पुढचे दिवस पुन्हा लॉकडाऊनच्या खाईत लोटणारे दिसून येत आहेत. मागील लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी, मजूर, व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांचा आर्थिक कणा मोडला होता. आता पुन्हा लॉकडाऊन लादल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे निर्बंधांची पावले विचारपूर्वक उचलली जात असताना दुसरीकडे लोक खबरदारीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी, रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. मार्च महिना हा अतिशय घातक ठरताना दिसतोय. आतापर्यंतच्या २० दिवसांत रुग्णसंख्येने हजारी ओलांडली आहे. त्यापेक्षाही गंभीर म्हणजे, मागील एका आठवड्यात तब्बल ६७५ रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वीच्या दोन महिन्यांतइकी रुग्णसंख्या १० दिवसांतच आढळून आली आहे. प्रशासनही आता एकेक पावले कठोर उचलत असून, परिस्थिती अशीच राहिल्यास उस्मानाबादकरांची वाटचालही लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे.
वाढीचा स्पीड झाला सातपट...
मागील एका आठवड्यात ६७५ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहेत. तत्पूर्वी संपूर्ण जानेवारी महिन्यात ५५४ तर फेब्रुवारीत ३८३ रुग्ण सापडले होते. जानेवारीत दिवसाकाठी सरासरी १८ तर फेब्रुवारीत १४ रुग्ण आढळून आले. आता मार्चमधील मागील एक आठवड्यातील आकडेवारी पाहिली असता दररोज सरासरी ९७ रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत रुग्णवाढीचा हा स्पीड सातपट वाढला आहे.
सोमवारपासून कडक अंमलबजावणी...
रुग्ण वाढत असल्याने यापूर्वी प्रशासनाने रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. दुकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी होती. मात्र, आता सोमवारपासून संचारबंदीची वेळ सायंकाळी ७ वाजेपासून लागू होत आहे. त्यामुळे दुकानेही सायंकाळी ७ वाजताच बंद करावी लागणार आहे. यातून वैद्यकीय व प्रवासी वाहतूक वगळण्यात आली आहे. पालिका, नगरपंचायत हद्दीतील पेट्रोलपंपही याच वेळेत बंद होतील. यातून राष्ट्रीय महामार्गावरील व उस्मानाबादेतील पोलीस पंपास वगळण्यात आले आहे.