यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. एप्रिल ते मे महिन्यात परराज्यात तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातून मोठ्या संख्येने नागरिक येत होते. या कालावधीत नागरिकांना रोहयो चा आधार मिळत होता. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर अनेक नागरिक आपल्या कामाच्या ठिकाणी परतले आहेत. त्यामुळे सध्या रोजगार हमीच्या कामावर ग्रामीण भागातीलच नागरिक काम करीत आहेत. सध्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतीपैकी १५९ ग्रामपंचायतीअंतर्गत ४७७ विविध कामे सुरु आहेत. या कामांवर ३ हजार ४६१ मजूर उपस्थित आहेत. रोहयोअंतर्गत कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण रेशीम कार्यालयाचे कामांचा समावेश आहे. तर अद्यापही जिल्ह्यातील ४६३ ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरु नाही.
चौकट
रोहयोची कामे घटली
मागील तीन चार महिन्यापासून रोहयोच्या ग्रामपंचायतीअंतर्गत कामांची संख्या घटली आहे. ६२२ पैकी १५९ ग्रामपंचायतीद्वारे कामे सुरु आहेत. अनलाॅकनंतर अनेक मजूर शहरात कामानिमित्त गेले आहेत. शिवाय, काही मजूर शेतीच्या कामात व्यस्त होते. सध्या शेतीची कामे नसल्याने अनेक मजूरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कोट...
ग्रामीण भागात हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. मात्र, या योजनेचे कामे बंद असल्यामुळे रोजगारासाठी बाहेर गावी कामाला जावे लागत आहे. गावातच रोजगार हमीचे काम नेहमी सुरु राहिले तर हाताला काम मिळेल.
- वसिम शेख, रोहयो मजूर