उस्मानाबाद : सध्या जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेत धडे गिरवणाऱ्या पहिली ते आठवीच्या वर्गातील सुमारे पावणेदोन लाखावर विद्यार्थ्यांना सुटीच्या काळातही पोषण आहार दिला जाणार आहे.
संपूर्ण पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्केच्या आसपास पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. अनेक प्रकल्प ऐन हिवाळ्यातच कोरडे पडले आहेत. ज्या काही प्रकल्पांत थोडाबहुत साठा आहे, तोही झपाट्याने कमी होत आहे. चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सरकारने सुरूवातील उमरगा आणि भूम वगळता उर्वरित सहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. भूम आणि उमरगा या तालुक्यातील जनतेने चोहोबाजुंनी दबाव आणल्यानंतर शासनाने दोनही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
टंचाई निवारणार्थ शासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहावी, बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. यासोबतच आता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीमध्येही पोषण आहार देण्यात येणार आहे. तशा सूचना राज्य शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी शासनास सादर केली आहे. सदरील अहवालानुसार सुमारे १ हजारावर शाळांतील १ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार पुरविला जाणार आहे.
दुध, अंडी अन् फळेही देणारविद्यार्थ्यांना नियमित पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारासोबतच उन्हाळी सुटीमध्ये दूध, अंडी आणि फळेही देण्यात येणार आहेत, असे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुटीच्या काळात विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. सदरील कामांमध्ये कुचराई झाल्यास दोषींवर कारवाई करण्याबाबतही सरकारचे निर्देश आहेत.