लोकमत न्यूज नेटवर्क, तुळजापूर (जि. धाराशिव) : श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी मागील चार दिवसांपासून सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी पहिल्यांदा हिऱ्यांची मोजणी करण्यात आली. संपूर्ण मोजणीअंती एकूण ३५४ हिऱ्यांचे खडे भाविकांनी देवीला वाहिल्याचे स्पष्ट झाले. तसेच सोने व ४.८९ कॅरेट हिऱ्यांचे एक मंगळसूत्रही आढळून आले आहे.
हिऱ्यांच्या मोजणीनंतर पुन्हा सोन्याच्या दागिन्याची मोजदाद सुरू झाली. दिवसअखेर सात किलोग्रॅम सोन्याची मोजणी पूर्ण झाली. आजपर्यंत एकूण २६ किलोग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची मोजणी झाल्याचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर शिंदे यांनी सांगितले. हिऱ्यांची शुद्धता व किंमत अद्याप निश्चित झाली नसल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी नियुक्त समिती, आयकर विभागाकडून नियुक्त प्रतिनिधी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर शिंदे, तहसीलदार संतोष पाटील यांच्या उपस्थितीत ही मोजणी करण्यात आली.
महिनाभर चालेल दागिन्यांची मोजणी
देवीला वाहिलेल्या मौल्यवान वस्तूंची मोजदाद पूर्ण होण्यास सुमारे एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. भांडारात अंदाजे दोनशे किलो सोने, तर चार हजार किलो चांदीच्या वस्तू आहेत. पहिल्या टप्प्यात चांदीच्या मोठ्या वस्तू मोजल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये हत्ती, मोर, वाहने अशा वस्तूंचा समावेश आहे.