कळंब : ऐन खरिपाच्या तोंडावर उत्पादक कंपन्यांनी खताच्या दरवाढीचा झटका दिला आहे. या स्थितीत जुना साठा, जुन्या दरातच विकला जाणार आहे, असे कंपन्या व कृषी विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र साठेबाज या साठ्यांचा शेतकऱ्यांना ताळमेळ लागू देतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दरवर्षी खरीपपूर्व नियोजन करत खतांची मागणी नोंदवली जाते. यंदा याच काळात काही कंपन्यांची जवळपास ५० ते ६० टक्के दरवाढ असलेली कार्यालयीन पत्रके सोशल माध्यमांवर फिरली. यानुसार सर्वाधिक वापर असलेल्या डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी, एनपीके आदी विविध गटांतील खताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात जमा आहेत.
याविषयी ओरड सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ही दरवाढ नसल्याचे तर कंपन्यांनी ही दरवाढ केवळ नव्या खतासाठी असल्याचे सांगितले होते. यामुळे अधिकच भ्रम निर्माण झाला असताना आता संभावित दरवाढ वास्तवात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच खरिपाच्या नियमित पिकांची मागणी गृहीत धरली तर खतांच्या मागणीत काही प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. यातच आता हा दरवाढीचा झटका असह्य असा आहे. शिवाय साठेबाजी, शॉर्टेज याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे.
चौकट...
जुना साठा, जुने दर...
दरम्यान, यासंदर्भात कृषी विभागाने यापूर्वी खत विक्रेत्यांकडे असलेल्या जुन्या साठ्यामधील खताची विक्री ही जुन्याच दराने होणार आहे, असे कळविले होते. तालुक्यात असा चार हजार मेट्रिक टनाच्या आसपास साठा असल्याचे सांगण्यात येते. या जुन्या साठ्यातील खताची, जुन्याच दराने विक्री करणे अपेक्षित आहे. पण, वास्तावात सध्या असे होतेय का? हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
साठ्याचे अपडेट रेकॉर्ड कोणाकडे...
तालुक्यासाठी आगामी खरीप हंगामात ८ हजार ७२९ मेट्रिक टन एवढ्या खताचे आवंटन मंजूर आहे. यापैकी चार हजार मेट्रिक टन उपलब्ध आहे. यातील १ एप्रिलपूर्वीचे खत किती व नंतरचे खत किती, विक्रेत्याकडे जुने खत किती आहे सद्या कोणत्या व्यापाऱ्याकडे किती खत आहे, याची अपडेट माहिती मिळू शकली नाही. यामुळे जुना साठा कोणाकडे किती आहे याची जाहीर प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. खत विक्रीत पारदर्शकता यावी, साठेबाजी व ऑन विक्रीला आळा बसावा यासाठी कार्यान्वित केलेल्या ‘पॉस’ यंत्रणेचे ‘ऑडिट अन् मॉनिटरिंग’ कोण करतेय हे एक कोडेच आहे.
गोणीवरील किंमत पाहा, पॉसची पावती घ्या...
जुन्या अन् नव्या दरात मोठी तफावत असल्याने याचा खताच्या साठ्यातील ‘मास्टर’ फायदा घेऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांची लूट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना गोणीवरील छापील किंमत पाहून, त्यानुसार रक्कम देऊन अन् पॉस मशीनवरील पावती घेऊनच खरेदी करणे आवश्यक आहे. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर जुना साठा नाही म्हणणे किंवा जादा दराने विक्री करून बिल न देणे, सदर विक्री जवळच्या व्यक्तीच्या नावावर पॉस मशीनला खतवणे असे प्रकारही होऊ शकतात. यासाठी त्यांना स्वतःलाच सतर्क राहावे लागेल.
भरारी पथक गठीत...
तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकाचे कृषी अधिकारी (ता. कृ. का) सचिव तर पंसचे कृषी अधिकारी व वजन मापे निरीक्षक सदस्य आहेत. काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी यांच्याकडे संपर्क साधावा, असे कृषी अधिकारी वीरेश अंधारी यांनी सांगितले.