उस्मानाबाद - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार करत आहेत. कार्यकर्तेही जीवाचं रान करुन आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी झटताना दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात बाजी कोण मारणार याचीच चर्चा गावागावात चौकाचौकात सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता, काही टप्प्यात मतदान झाल्यानंतर निवडणूक कोण? याबाबात पैजही लावल्या जात आहेत. मात्र, उस्मानाबाद मतदारसंघात चक्क स्टँप पेपरवर लिहून शर्यत लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील अशा प्रकारची ही दुसरी शर्यत आहे.
ग्रामीण भागात निवडणुकीचा माहोल काही औरच असतो. कार्यकर्ते आपलाचा नेता विजयी होईल अशा थाटात बोलत असतात. अनेक जण निवडणुकीच्या निकालांवर तर्कवितर्क लावत असतात. यात उस्मानाबाद मतदारसंघातील घाटंग्री व वाघोली येथील दोन कार्यकर्त्यांत पैज लागली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात निवडून कोण येणार? यावरुन ही पैज लागली आहे. एक म्हणतो, राणा दादा तर दुसरा म्हणतो ओमराजे. उस्मानाबाद मतदारसंघातील दोन पठ्ठ्यांनी निवडणूक निकालांवर पैज लावत चक्क स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतलाय. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत यंदा शिवसेना-भाजपाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून राणा रणजितसिंह पाटील निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे उस्मानाबाद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
उस्मानाबादच्या मतदारसंघात कोण जिंकणार यासाठी घाटंग्रीमधील ग्रामस्थ शेतकरी जीवन अमृतराव शिंदे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या बाजुने आपली पैज लावली आहे. तर, हनुमंत पाराप्पा ननवरे असे राणा जगजितसिंह पाटील यांच्या बाजुने असलेल्या मॅकेनिकल ग्रामस्थाचे नाव आहे. हनुमंत ननवरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून राष्ट्रवादीचे नेते आहेत. या दोघांनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतला आहे. करारनाम्यात लिहून देणारे जीवन शिंदे म्हणतात की, जर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राणाजगजीतसिंह पाटील निवडून आल्यास माझ्या मालकीची इलेक्ट्रो कंपनीची बुलेट हनुमंत ननवरे यांना विना मोबदला बक्षिस म्हणून दिली जाईल. सदरील गाडीची मालकी लिहून घेणारे हनुमंत ननवरे यांची राहील, त्यास माझा कोणताही आक्षेप नसल्याचं शिंदे यांनी करारनाम्यात लिहून दिलं आहे. तर, निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 मे रोजी जीवन शिंदे आपल्या मालकीची गाडी ननवरे यांच्या नावे करणार आहेत. मात्र, जर निवडणुकीत ओमराजे निंबाळकर निवडून आले, तर हनुमंत ननवरे यांची चारचाकी इंडिगो गाडी जीनव शिंदे यांच्या नावाने करतील, असं या करारनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.
इतकंच नाही तर या करारनाम्यात हेही नमूद केलंय की, हा करारनामा दोघांनीही राजीखुशीने केला असून कोणत्याही दबावाला बळी न पडता केल्याचं लिहिण्यात आलं आहे. तसेच साक्षीदार म्हणून दोन ग्रामस्थांनी सह्यादेखील केल्या आहेत. त्यामध्ये, सुरेश शाहू शिंदे आणि जगदीश जालिंदर जाधव हे साक्षीदार राहिले आहेत.