कळंब : येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या पोषण आहार पाककृती स्पर्धेत तालुक्यातील जवळपास दीडशे महिलांनी सहभाग नोंदविला. यातून सौंदणा (आंबा), ईटकूर व शेळका धानोरा येथील महिलांच्या पाककृतीने स्पर्धेत बाजी मारत जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रवेश मिळविला.
या कार्यालयाच्या प्रभारी बालविकास अधिकारी रेखा काळे झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जवळा (खु), माळकरंजा, गोविंदपूर, शेळका धानोरा, बोर्डा, तांदूळवाडी, सौंदणा आंबा, इटकूर, मस्सा (खं), येरमाळा आदी गावातील महिला बचत गट, शून्य ते सहा वर्षापर्यंतच्या बालकाच्या माता, किशोरी बालिका आदींनी सहभाग नोंदविला. या सहभागी महिलांनी स्वतः पोषक आहाराची पाककृती आणली होती. त्याचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले. यामध्ये सौंदणा आंबा येथील अनिता देवकते यांचा प्रथम, ईटकूर येथील संगीता सावंत यांचा द्वितीय तर शेळका धानोरा येथील लता शेळके यांचा तृतीय क्रमांक आला. त्यांच्या पाककृती आता जिल्हास्तरीय प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
या यशस्वी स्पर्धकांचा भाजप अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी कार्यालयाच्या पर्यवेक्षिका टी. बी. बोराडे, थोरात, बोरफळकर, आगलावे, सावंत, मोमीन, कार्यालयीन कर्मचारी एस. ए. शिंदे, गायकवाड, समुद्रे आदींनी पुढाकार घेतला.