उस्मानाबाद : जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची भर मोठ्या वेगाने पडत आहे. दुसर्या लाटेतील उच्चांकी रुग्ण हे शुक्रवारी आढळून आले. तब्बल २९२ रुग्ण एकाच दिवशी आढळून आल्याने आता ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ही २ हजार पार झाली आहे. यामुळे शासकीय रुग्णालयांवरील ताण वाढत चालला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज सरासरी अडीचशे नवीन कोरोना बाधित आढळून येत आहेत. वरचेवर ही संख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टमध्ये तब्बल २९२ रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे उस्मानाबाद तालुक्यात आढळून आले आहेत. २९२ पैकी १७८ रुग्णांची नोंद ही उस्मानाबाद तालुक्यातील आहे. यापाठोपाठ उमरगा तालुक्यात २७, परंडा १९, तुळजापूर व लोहारा तालुक्यात प्रत्येकी १७, भूम १३, वाशी ११ तर कळंब तालुक्यात १० रुग्णांची नोंद झाली आहे. या अहवालानुसार रॅपिड ८३६ तर आरटीपीसीआर ४४५ अशा एकूण १२८१ टेस्ट करण्यात आल्या होत्या. यातील बाधित रुग्णांचे प्रमाण जवळपास २३ टक्के इतके आहे. म्हणजेच टेस्ट झालेल्या प्रत्येकी जवळपास ४ व्यक्तींमागे १ जण कोरोना बाधित निघतो आहे. हे प्रमाण चिंता वाढविणारे आहे.
उस्मानाबाद शहर ठरतेय हॉटस्पॉट...
उस्मानाबाद तालुक्यात शुक्रवारी १७८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकीकेवळ ४४ रुग्ण हे बाहेर गावचे असून, उर्वरित १३४ रुग्ण हे शहरात आढळून आले आहेत. म्हणजेच जिल्ह्याच्या एकूण बाधितांपैकी जवळपास निम्मे रुग्ण हे एकट्या उस्मानाबाद शहरात आढळले आहेत.
खाजगी रुग्णालयांत वेटिंग...
उस्मानाबाद शहरात कोविड उपचार मिळणार्या खाजगी रुग्णालयांतील निम्मे बेड हे कोरोना बाधितांवरील उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हे बेड आता अपुरे ठरु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्वच खाजगी रुग्णालयांतील बेड फुल्ल होत असून, येथे रुग्ण वेटिंगवर आहेत.