गणेश उत्साहाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी गणेश मूर्ती व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भक्तांनी गर्दी केली. शहरातील जुनी बाजर पेठ, अशोक चौक, सिद्धरामेश्वर मठ येथील दुकान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यापाऱ्यांनी गणेश मूर्तीचे दुकाने थाटली होती. वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक अशा मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षा पासून मुर्तीकारांना व्यवसायावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत आहे. यंदाही शासनानाच्या नियमानुसार फक्त ४ फूट पर्यंतच्या मूर्ती विक्रीस आणल्या होत्या. सकाळ पासूनच गणेश मूर्ती व सजावट वस्तू, लायटिंग माळासह गणेशाला आरास व पुजेसाठी फळांची खरेदी करण्यासाठी देखिल भक्तांनी गर्दी केली होती.
दरम्यान, मुरूम पोलिस ठाण्याअंतर्गत ४५ परवानाधारक व १० विनापरवाना अशा एकूण ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा श्रींच्या मूर्तीची स्थापना केली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत या मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच प्रशासन देखील या उत्सवावर बारीक लक्ष ठेवून आहे. या ठाण्याअंतर्गत कडदोरा, महालिंगरायवाडी, दस्तापूर, नाईकनगर (सु), कंटेकूर, भुसणी, वरनाळवाडी, गणेश नगर, अंबरनगर तांडा, मुरळी आणि कोथळी या गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.