पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी जवळपास अडीचशे नागरिक आले होते. यात पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचा समावेश होता; परंतु प्रशासनाकडून केवळ १०० डोस उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना रिकाम्या दंडानेच परतावे लागले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण सहा उपकेंद्र असून, यापैकी काही उपकेंद्रांत लसीकरण शिबिर झाले आहे; परंतु इतर उपकेंद्रांतर्गत गावातील नागरिक पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी येत आहेत. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहेत. सोमवारी पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले. यासाठी प्रशासनाकडून १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते; परंतु ही लस घेण्यासाठी जवळपास अडीचशे नागरिक येथे दाखल झाले होते. त्यामुळे लसीकरणाच्या वेळी स्थानिक प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. सकाळी नऊ वाजता लसीकरणास सुरुवात झाली. यानंतर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सर्व डोस संपले. त्यामुळे उर्वरित नागरिकांना लस न घेताच घराकडे परतावे लागले. या लोकांचा रोष वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांना सहन करावा लागला.
कोट........
पारगाव आरोग्य केंद्रात होणारे लसीकरण हे प्रत्येक गावनिहाय करावे किंवा डोस तरी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. सोमवारी लसीकरणाच्या वेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणत गर्दी केली होती; परंतु डोस अपुरे होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनदेखील हतबल झालेले होते. यासाठी योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
- धनंजय मोटे, सदस्य, ग्रामपंचायत
वरिष्ठांकडून लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत लस उपलब्ध होत आहे. आपली मागणी लाखाच्या आकडेवारीत असताना प्रत्यक्षात ती हजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला लसीकरण समप्रमाणात द्यावे लागत आहे. लसीकरणाच्या बाबतीत नागरिक सजग झाल्याने व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणासाठी गर्दी करत आहेत. या पुढील लसीकरणासाठी अधिकची मागणी केली जाणार आहे.
- कुलदीप मिटकरी, बाल विकास अधिकारी उस्मानाबाद.