ढाेकी (जि. धाराशिव) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी राेखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी ताफ्यातील वाहनांच्या समाेर जात ‘‘एक मराठा, लाख मराठा’’, ‘‘मनाेज जरांगे-पाटील आप आगे बढाे’’ अशा जाेरदार घाेषणाही दिल्या.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी जनसंवाद दौऱ्यासाठी कळंब येथे जात हाेते. ढाेकी येथील कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी ते गाडीच्या खाली उतरले असता, अचानक मराठा समाजाच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव ठाकरे यांचा ताफा राेखला. ‘‘तुम्ही वाहनाच्या खाली उतरू नका. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच नेत्याला गावात प्रवेश मिळणार नाही’’, असे सांगत ‘‘एक मराठा, लाख मराठा’’ अशा घाेषणा दिल्या. ढाेकी पाेलिसांनी तातडीने समाेर येत मराठा आंदाेलकांना बाजुला करून वाहनांच्या ताफ्यासाठी रस्ता माेकळा केला असता ताफा कळंबच्या दिशेने रवाना झाला.
कळंब येथे दिले निवेदन...माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कळंब येथे दाखल झाल्यानंतर तेथील मराठा बांधवांनी एकत्र येत त्यांना निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावेत, यासाठी आपण खंबीर भूमिका घ्यावी. तसेच मराठा समाजाच्या विराेधात भूमिका घेणारे हाके यांना शिवसेना पक्षातून बाहेर काढावे, अशी मागणीही करण्यात आली.