- बालाजी बिराजदार
लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा शहरासह तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यातच दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे सोयाबीनचे ७० टक्के व पावणेदोनशे हेक्टरवरील कांदा वाया गेला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गाव म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील एकेक शेतकरी १० ते १५ एकरावर कांदा लागवड करतात. भाव असो, वा नसो प्रत्येक वर्षी कांदा लागवड ठरलेलीच. यंदाही सालेगावातील शेकडो शेतकऱ्यांनी सुमारे पावणेदोनशे हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. अधूनमधून पडलेल्या रिमझिम पावसामुळे कांदा पीक जोमदार आले होते. त्यामुळे यंदा कांद्याच्या माध्यमातून आपले भले होईल, म्हणून शेतकरी आनंदात होते. परंतु, अवकाळी पावसाने सर्व स्वप्नांवर पाणी फेरले. कांद्याच्या शेतीत १० ते १५ दिवस पाणी होते. त्यामुळे कांदा जमिनीतच सडला आहे. होत्याचं नव्हतं झालं. सालेगाव येथील २३ वर्षीय तरुण शेतकरी किरण पाटील यांच्या वडिलांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आईवर आली. किरण व तीन मुलींचा सांभाळ करीत त्यांनी शेतीही सांभाळली. दीड वर्षापूर्वी एका आजाराने किरण यांच्या आईचेही निधन झाले. त्यामुळे लहान वयातच घराची आणि शेतीची जबाबदारी किरण यांच्यावर येऊन ठेपली. परंतु, धीर न सोडता किरण यांनी १५ एकर शेती कसण्यास सुरुवात केली. सध्या ५ एकरावर सोयाबीन, तूर तर साडेचार एकरावर कांदा हे पीक आहे. कांदा लागवडीवर आजवर ३५ हजार रुपये खर्च झाले. कांद्याचे पीक दमदार आले होते. त्यामुळे चांगला दर मिळून परिस्थिती सुधारेल, असे वाटत असतानाच तडाखा बसला. ७० टक्के कांदा जमिनीतच सडून गेला. पंचनामे बाकी आहेत. त्यामुळे आता शासनाने भरीव मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी किरण यांनी व्यक्त केली.
जोरदार पिकाला लागली नजरफुलचंद देशपांडे हेही यास अपवाद नाहीत. त्यांना एकूण ८ एकर शेती. दोन एकरात कांदा आणि उर्वरित क्षेत्रात सोयाबीन, तुरीचे पीक घेतले. लागवडीपासून ते आजवर २१ हजार ४०० रुपये खर्च झाले. पीकही जोरदार होते, परंतु परतीच्या पावसात हे पीक आठ दिवस पाण्यात राहिले. त्यामुळे पात पिवळी पडली आणि कांदाही सडला. परिणामी, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता आम्ही करायचे तरी काय? असा सवाल शेतकरी देशपांडे यांनी केला.