उस्मानाबाद : खरीप हंगामात यावर्षी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी, जिल्हा बँकेस १,५३९ कोटी ८० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. बॅंकांच्या उदासीन धोरणामुळे आतापर्यंत २६ टक्के पीककर्ज वाटप करुन ६४ हजार १४३ शेतकऱ्यांना लाभ दिला आहे.
जिल्ह्यात वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत चालले आहेत. शेतकऱ्यांना पेरणी, बियाणे, खत खरेदीस तसेच अन्य शेतीकामात अडथळे येऊ नयेत, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करुन दिले जात असते. यंदा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. १ एप्रिल पासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास सुरुवातही झाली आहे. मात्र, एप्रिल व मे महिन्यात कोविड प्रतिबंधासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच संचारबंदी ही लावण्यात आलेली आहे. त्यामुळे या काळात एसटीची वाहतूक सेवाही ठप्प होती. परिणामी, वाहतूक सेवा सुरळीत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शहरात बँकामध्ये येता येत नव्हते. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्यास अडथळे निर्माण होत होते. असे असतानाही अनेक शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करुन पेरणी उरकून घेतली. त्यानंतर पिकांना खत तसेच खुरपणी, कोळपणी, खतासाठी शेतकरी पीककर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. मात्र, बँकाच्या उदासीन धोरणामुळे जून अखेर केवळ ६४ हजार १४३ शेतकऱ्यांना ४०२ कोटी ६६ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जवाटपाची टक्केवारी २६ टक्के इतकी आहे. अद्यापही ७४ टक्के पीक वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण आहे.
कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर
खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेस ३२७ कोटी ४ लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. जून अखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखेकडून ४३ हजार ५७५ शेतकऱ्यांना १७४ कोटी ११ लाख रुपये वितरित करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ५३ टक्के इतकी आहे.