धाराशिव : एकरभर शेतजमिनीत उत्पादित केलेल्या गावरान कोथिंबीरच्या एका पेंढीला बाजारात पन्नास पैशांचा भाव मिळाल्याने अखेर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील भास्कर पवार या शेतकऱ्याने एक एकर कोथिंबीरच्या शेतीवर शनिवारी रोटाव्हेटर फिरवला. यात त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
तामलवाडी शिवारात भास्कर पवार यांची शेती असून, त्यांनी आजवर वेगवेगळे प्रयोग करून उत्पादने घेतली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक एकर काळरान जमिनीत गावरान कोथिंबीर बियाण्याची पेरणी केली. तुषार सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन केले, खते फवारणी, पेरणीसाठी ३० हजार रुपयांचा खर्च करून उत्तमरित्या जोपासणी केली. परंतु, कोथिंबीर काढून बाजारात विक्रीसाठी न्यायची तयारी सुरू असतानाच सोलापूरच्या बाजारात भावात घसरण होऊन २० ते २५ रुपये दराने विकली जाणारी पेंढी ५० पैशालासुद्धा कोणी व्यापारी विचारेना. यामुळे वाहतूक भाडे, काढणीसाठीचा खर्च आदी खर्चही पदरात पडणार नसल्याने शनिवारी त्यांनी एकरभर हिरव्यागार कोवळ्या कोथिंबिरीत रोटाव्हेटर फिरवला.
लागवडीचा खर्चही पदरात नाही...कोथिंबीरच्या एका पेंढीला ५० पैशांचा भाव बाजारात मिळू लागला आहे. यामुळे उत्पादन तर सोडा लागवडीचा खर्चही पदरात पडत नाही. बाजारात शेतकऱ्याच्या मालाची व्यापारी कवडीमोल दराने मागणी करतात. त्यामुळे अखेर कोथिंबीर शेतीवर रोटाव्हेटर फिरवून ती जमिनीत गाडली. भाव घसरल्यामुळे माझे दोन लाखांचे नुकसान झाले.- भास्कर पवार, शेतकरी, तामलवाडी