उस्मानाबाद (संत गोरोबा काका साहित्यनगरी) : सध्याच्या समाजव्यवस्थेत व्यक्त होण्यासाठी व्यासपीठं उरलेली नाहीत. अशा परिस्थितीत उस्मानाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बालकुमार साहित्य संमेलन भरवून विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय बालकुमार साहित्य संमेलनास शनिवारी थाटात प्रारंभ झाला. याप्रसंगी विशेष अतिथी पदावरून ते बोलत होते. मंचावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, संमेलनाध्यक्ष साक्षी तिगाडे, जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा जि.प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आदींची उपस्थिती होती.
चंदनशिव म्हणाले, संपूर्ण समाजव्यवस्थेत सध्या संभ्रमावस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. हे सर्व माणसाला माणुसकीपर्यंत घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेच्या अभावामुळे घडत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता खऱ्या अर्थाने साहित्यात आहे़ मात्र, त्यासाठी सध्या व्यासपीठं उरलेली नाहीत. त्यामुळे साहित्य चळवळ हव्या तेवढ्या प्रमाणात व्यापक होताना दिसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ठासून भरलेली आहे. तळागळातील घटकांचे प्रश्न ते जवळून पाहत आहेत. परंतु, त्यांच्यातील कल्पकतेला योग्यवेळी योग्य व्यासपीठ मिळत नाही. पर्यायाने त्यांना व्यक्त होता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामीण भागासोबतच शहरातही अशा प्रकारची बालकुमार साहित्य संमेलने भरविणे काळाची गरज असल्याचे मत चंदनशिव यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आ. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषदेने अशा स्वरूपाचे संमेलन प्रत्येक वर्षी भरवावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. ग्रंथदिंडीमध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उस्मानाबादकरांचे लक्ष वेधून घेतले.