कळंब ( धाराशिव) : नम्रता दत्तात्रय पौळ या अवघ्या २४ वर्षे वयाच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झालं असून, लोकसेवा आयोगाच्या ‘सब रजिस्टार’ पदाला गवसणी घालत अवघ्या पाचव्या महिन्यात यशाचा चौकार’ तिने लगावला आहे.
नम्रता दत्तात्रय पौळ ही मूळ राहणार वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील असली तरी तिचा हल्ली मुक्काम कळंब तालुक्यातील आंदोरा येथे आहे. जिद्दी व कष्टाळू नम्रताने अवघ्या पाच महिन्यांत शासनाच्या विविध विभागांच्या चार स्पर्धा परीक्षेत ‘पोस्ट क्रॅक’ करत अद्वितीय असे मिळविलेले यश. नम्रताचे मार्गदर्शक व समर्थ फाउंडेशनचे प्रमुख प्रा. बनेश्वर शिंदे सांगतात की, अतिशय मितभाषी असलेली नम्रता इतर विद्यार्थ्यांसाठी एक ‘आयडॉल’ आहे. सातत्यपूर्ण अभ्यास हे तिच्या यशाचे गमक आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे, मुंबई न गाठता खेड्यात केला अभ्यासलहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या नम्रता आणि तिच्या भावंडांचा सांभाळ आंदोरा येथील आजी चंद्रभागा तांबारे व मावशी छाया अशोक पाटील हे मोठ्या मायेने करत आहेत. याच बळावर आपल्या दोन भावंडांसह नम्रता खंबीरपणे स्पर्धेला तोंड देत स्वयंसिद्धा ठरली आहे. आंदोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेत प्राथमिक, कळंब येथील सावित्रीबाई फुले शाळेत माध्यमिक व उच्चमाध्यमिक तर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण तीने घेतले आहे. विशेष म्हणजे, नम्रताने पुणे, मुंबई न गाठता आंदोरा या खेड्यात वास्तव्य करत स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवले आहे.
पाच महिन्यात चार सरकारी पोस्टवर नियुक्तीनम्रता पौळची प्रथम २०० पैकी १९६ गूण घेत बीड येथे २४ जानेवारी रोजी तलाठी पदावर नियुक्ती झाली. यानंतर १३ मार्चला तीची एमपीएसीमार्फत विक्रीकर अधिकारी पदी निवड झाली. या यशाचे कौतुक होत असतानाच अवघ्या तीस दिवसात सहाय्यक कक्ष अधिकारी आणि मंगळवारी ‘सब रजिस्टार’ या वर्ग दोन पदावर नम्रताची निवड झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.