उस्मानाबाद : चालू गळीत हंगामात यंदा जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे़ या साखर कारखान्यांनी आजवर ११ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, १० लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे़
मागील दोन वर्षात परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली़ परिणामी मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पातील पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली़ तर दुसरीकडे विहिरी, कुपनलिकांमधील पाणीपातळी वाढ झाल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले़ यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी ९ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे़ या कारखान्यांनी चालू गळीत हंगामात एकूण ११ लाख ९ हजार ७१४ मेट्रीक टन उसाचे गाळप करून १० लाख ३१ हजार ५२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे़ यात मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याने यंदा १ लाख २९ हजार ७६० मेट्रीक टन उसाचे गाळप करीत १ लाख ३२ हजार क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.
केशेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने १ लाख ८० हजार ७६४ मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे़ तर १ लाख ७८ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे़ वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याने ८९ हजार ४३५ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, ७३ हजार ७०० मेट्रीक टन साखर उत्पादीत केली आहे़
रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्याने सर्वाधिक २ लाख ४० हजार ८९० मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून, २ लाख ५१ हजार १५० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ भिमाशंकर साखर कारखान्याने ४२ हजार ६७० मेट्रीक टन उसाचे गाळप करून ३६ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ चोराखळी येथील धाराशिव शुगरने ८४ हजार ७३० मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे़ तर ६५ हजार ७६० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.
सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याने १ लाख २२ हजार ८२० मेट्रीक टन उसाचे गाळप करीत ९६ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने ८९ हजार ९८५ मेट्रीक टन उसाचे गाळप करून ६४ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे़ तर मंगरूळ येथील कंचेश्वर शुगरने चालू गळीत हंगामात १ लाख २८ हजार ६६० मेट्रीक टन उसाचे गाळप करून १ लाख ३२ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे.