उस्मानाबाद : लोकसभा मतदार संघामध्ये विकास कामे राबविण्याठी खासदारांना प्रत्येक वर्षी साधारपणे चार कोटी रूपये उपलब्ध करून दिले जातात. या निधीतून मतदार संघाचा चौफेर विकास होणे अपेक्षित आहे. मात्र, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी मागील चार वर्षांत उपलब्ध झालेला निधी ठराविक तालुक्यांमध्येच अधिक प्रमाणात खर्च केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले आहे.
खासदार फंडातून मागील चार वर्षांत सुमारे ६७८ कामे मंजूर करण्यात आली. यापैकी तीनशेवर कामे उस्मानाबाद, कळंब तालुक्यात झाली आहे. म्हणजेच म्हणजेच ४० ते ४५ टक्के फंड या दोन तालुक्यात खर्च झाला. तर दुसरीकडे परंडा, भूम आणि वाशी तालुक्यात केवळ ३५ कामे झाली आहेत. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांसोबतच बार्शी, औसा तसेच निलंगा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. अशा मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी शासनाकडून प्रत्येक खासदारास दरवर्षी सुमारे ४ कोटी रूपये उपलब्ध करून दिलेल जातात. या निधीतून प्रवासी निवारे, विद्युत दिवे, रस्ते, नाल्या, सभामंडप आदी प्रकारची विकास कामे राबविता येतात.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनाही विकास कामे करण्यासाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी मिळाला. या निधीतून प्रत्येक तालुक्याला समान न्याय मिळणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. उस्मानाबाद-कळंब या विधानसभा मतदार संघात सद्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. नेमक्या याच भागात एकूण मंजूर कामांच्या ४० ते ४५ टक्के कामे देण्यात आली आहेत. ६७८ पैकी जवळपास ३०० कामे या दोन तालुक्यातील आहेत. २०१५-१६ मध्ये ४३, २०१६-१७ मध्ये ४६, २०१७-१८ मध्ये ६४ तर २०१८-१९ मध्ये ४८ कामे करण्यात आली. असे असतानाच दुसरीकडे डोंगरी भाग म्हणून ओळख असलेल्या भूमसह वाशी, परंडा तालुक्यात नाममात्र कामे राबविली.
तीन तालुक्यात मिळून चार वर्षात केवळ ३५ कामे करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, भूम तालुक्यात यापैकी केवळ पाच कामे आहेत. सेनेचा गड म्हणून ओळख असलेल्या पंडा तालुक्यातही फारसे समाधानकारक चित्र नाही. १५-१६ मध्ये या तालुक्यात एकही काम झाले नाही. २०१६-१७ मध्ये केवळ एका काम करण्यात आले. २०१७-१८ मध्ये ११ कामे तर २०१८-१९ मध्ये ७ अशी चार वर्षात अवघी १९ कामे झाली. वाशी तालुक्यात राबविलेल्या कामांची संख्याही बोटावर मोजण्याइतपत आहे. चार वर्षात केवळ ११ कामे करण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत तीनही तालुक्यांतील नागरिकांतून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.
उमरगा-लोहाऱ्यात केवळ ८२ कामेउमरगा-लोहाऱ्याला सेनेचा गड म्हणून ओळखले जाते. हा विधानसभा मतदार संघ सेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, खा. गायकवाड हे याच तालुक्यातील रहिवासी आहेत. असे असतानाही या तालुक्यांना फारसा निधी मिळाला नाही. चार वर्षात ८२ कामे मंजूर करण्यात आली. चार वर्षांचा विचार करता, साधारपणे वर्षाकाठी २० म्हणजेच एका तालुक्याच्या वाट्याला अवघी दहा कामे येतात. असे असतानाच दुसरीकडे एकट्या औसा तालुक्याला ८० कामे देण्यात आली आहेत. औसा विधानसभा मतदार संघावर काँग्रेसची सत्ता आहे, हे विशेष.
भूम-परंड्यापेक्षा बार्शीला झुकते मापभूम-परंडा या दोन तालुक्यांत चार वर्षामध्ये केवळ २४ ते २५ कामे राबविण्यात आली आहेत. असे असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यासाठी मात्र, वर्षभरात ६४ कामे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या मतदार संघावर आ. दिलीप सोपल यांच्या रूपाने राष्टÑवादीचे वर्चस्व आहे.
तुळजापुरात ५८ वर कामेतुळजापूर विधानसभा मतदार संघावर आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या उमरग्यापेक्षा तुळजापूरला जास्त विकास कामे राबविण्यात आली आहेत. चार वर्षामध्ये ५५ ते ५८ कामे करण्यात आली आहेत.
दृष्टिक्षेपात विकास कामेतालुका संख्याउस्मानाबाद २०१कळंब ९८भूम ०५परंडा १९वाशी ११लोहारा २७उमरगा ५५तुळजापूर ५८औसा ८०बार्शी ६४निलंगा ६०