उस्मानाबाद : उस्मानाबाद मतदारसंघात पाटील-राजेनिंबाळकर घराण्यात चुरशीची लढत होत आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंह पाटील, तर शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे आमनेसामने आहेत. तसे नात्याने हे दोघे चुलतभाऊच. त्यामुळे या भाऊबंदकीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता असणे स्वाभाविकच आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना 338231 मते पडली आहेत. तर राणा जगजीतसिंह पाटील यांनी 263154 मते पडली आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 08 हजार, 852 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत विक्रमी 67.5 टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का जास्त आहे. त्यामुळे ही मतं कुणाच्या पारड्यात जातात, हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत राणा जगजीतसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह वंचित आघाडीचे अर्जुन सलगर, बसपाचे डॉ. शिवाजी ओमन, आण्णासाहेब राठोड, दीपक ताटे, विश्वनाथ फुलसुरे, आर्यनराजे शिंदे, नेताजी गोरे, जगन्नाथ मुंडे, तुकाराम गंगावणे, वसंत मुंडे, शंकर गायकवाड, सय्यद सुलतान हेही रिंगणात आहेत.