उस्मानाबाद : तालुक्यातील आळणी शिवारात कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याच्या मुद्यावरून विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गुरूवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. मात्र, सत्ताधारी शिवसेना-भाजपाने राष्ट्रवादीचा विरोध झुगारून लावत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजेच्या सुमारास सभेला सुरूवात होताच राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे यांनी स्लॉटर हाऊसचा मुद्दा उपस्थित केला. आळणी फाटा येथे स्लॉटर हाऊस उभारण्यास ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. ग्रामसभेत ठसा ठरावही घेतला आहे. असे असतानाही उस्मानाबाद नगर परिषदेने शेतकरी अथवा ग्रामस्थांच्या भावनांचा विचार न करता स्लॉटर हाऊस उभारणीस ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले. या मागचे इंगित काय? असा सवाल त्यांनी केला.
यानंतर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनीही आक्रमक भूमिका घेतली. आळणीबद्दल आपला एवढा आग्रह का आहे? हे सर्वश्रूत आहे. स्लॉटर हाऊस अद्याप सुरू झालेले नाही. असे असतानाच आपणाला नदीतून रक्ताचे पाट वाहत असल्याचे दिसू लागले आहे. मग भोगावती नदीतून दिवसरात्र वाहनारे रक्ताचे पाट आपणाला दिसत नाहीत का? अशा शब्दात त्यांनी प्रतिहल्ला चढविला.
यावेळी विरोधी बाकावरील काही सदस्यांनी ‘स्लॉटर हाऊस’ प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. त्यावर नगराध्यक्ष अधिकच संतप्त झाले. सभागृहामध्ये अशी चुकीची भाषा वापरू नका असे, बोल सुनावत ‘एनओसी देऊन पालिकेने काही चूक केली आहे, असे आपणाला वाटत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा’, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला. सत्ताधारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधक शांत झाले. यावेळी काही सदस्यांनी शहर स्वच्छतेचा मुद्दाही उपस्थित केला. सभेला मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह सभापती, विभाग प्रमुख उपस्थित होते.