उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईट जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर गिते यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याचा संदर्भ देत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी पुढील दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे़ शिवाय, हद्दपारीच्या काळात शेजारच्या सोलापूर, नगर व बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही त्यांना वास्तव्य करता येणार नसल्याचे दंडाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे़
ज्ञानेश्वर गिते हे ईट जिल्हा परिषद गटातून २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत़ त्यांच्यावर वाशी ठाण्यात ४, पुणे जिल्ह्यातील जेजुरी ठाण्यात १ व भूम ठाण्यात १, असे ६ गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत़ यामध्ये धारधार शस्त्राने लोकांवर प्राणघातक हल्ले, घरात घुसून मारहाण, गुन्ह्याच्या उद्देशाने कट रचणे, महिलांच विनयभंग, अल्पवशीन मुलीस पळविणे, सार्वजनिक ठिकाणी मारहाण करुन दहशत निर्माण करणे, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे़ गिते यांची गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालली असून, त्यामुळे आंद्रुड व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ परिणामी, साक्षीदार त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यास धजावत नाहीत़ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे भूमच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीत अहवालात नमूद केले आहे.
या अहवालाचा आधार घेत उपविभागीय दंडाधिकारी डॉ़स्वप्निल मोरे यांनी गिते यांना हद्पार का करु नये, अशी नोटिस बजावली होती़ त्यास विधिज्ञामार्फत उत्तर देताना गिते यांनी आपला बचाव केला होता़ आपण सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय असल्याने राजकीय विरोधक राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचे म्हणणे मांडले़ तसेच काही गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली असून, काही गुन्हे मागे घेण्यात आले आहेत़ याउपरही आंद्रुड येथील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, पोलिस पाटील, चेअरमन यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत पदाधिकाऱ्यांनी आपली वर्तणूक चांगली असल्याचे लेखी शपथपत्र दिल्याचे म्हणणेही बचावात गिते यांनी मांडले होते़
दरम्यान, काही गंभीर गुन्हे, गोपनीय जबाबांची पडताळणी करुन दंडाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर गिते यांना हद्दपार करणेच योग्य राहील, असा निष्कर्ष काढला आहे़ या निष्कर्षाच्या अनुषंगाने मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम ५६ (अ) (ब) अन्वये दंडाधिकारी डॉ़स्वप्निल मोरे यांनी गिते यांना संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा व लगतच्या सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यातील काही तालुक्यांतून २ वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत़ या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़