उस्मानाबाद - महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत दमदार कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायतींचे गुणांकन निश्चित करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक जाहीर केले आहेत. प्रधानमंत्री आवास याेजनेत उस्मानाबाद जिल्हा परिषदे द्वितीय क्रमांक पटकावून ‘सर्वाेत्कृष्ट’ ठरली आहे, तर राज्य पुरस्कृत आवास याेजनेत अव्वलस्थान पटकाविले आहे. सर्वाेत्कृष्ट पंचायत समितीत वाशी, लाेहारा, तर सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या रांगेत धानुरी व पारगाव ग्रामपंचायतींना स्थान मिळाले.
दगड-मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा पक्का निवारा मिळावा, यासाठी केंद्र, तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास याेजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री आवास याेजनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, ग्रामपंचायतींनी दमदार कामगिरी केली. शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट मुदतीत पूर्ण केले. याच कामगिरीची आता सरकारनेही दखल घेतली आहे. सर्वाेत्कृष्ट जिल्हा परिषदेच्या पंक्तीत उस्मानाबाद द्वितीय स्थानावर आहे. सर्वाेत्कृष्ट पंचायत समितीच्या यादीत वाशी पं.स.ने तृतीय स्थान मिळविले आहे. सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या यादीत वाशी तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, राज्य पुरस्कृत आवास याेजनेतही ठळक कामगिरी केलेल्या संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेने अव्वलस्थान मिळविले, तर पंचायत समित्यांच्या यादीत लाेहारा द्वितीय स्थानावर आहे. सर्वाेत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या यादीत लाेहारा तालुक्यातील धानुरी ग्रामपंचायत द्वितीय स्थानी आहे. या सर्व संस्थांचा ३ सप्टेंबर राेजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात ‘महा आवास अभियान-ग्रामीण’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
काेट...
केंद्र, तसेच राज्य सरकारच्या याेजनेतून गाेरगरीब कुटुंबांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेकडून सातत्याने पाठपुरावा केला जाताे. याेजनेचा नियमित आढावा घेण्यात येताे. त्यामुळे काेणत्या याेजनेत आपण कुठे आहाेत, हे समाेर आले. त्यावर प्रशासनाकडून बारकाईने काम करून घेण्यात आले. पुरस्काराच्या रूपाने त्याचीच पाेचपावती मिळाली असे म्हणावे लागेल. दाेन्ही याेजनेत जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील दाेन पंचायत समित्या व दाेन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही बाब आम्हा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांस प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे.
-अस्मिता कांबळे, अध्यक्षा, जिल्हा परिषद.
जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे प्रधानमंत्री आवास याेजना व राज्य पुरस्कृत याेजनेत उस्मानाबाद जिल्हा परिषदेने दमदार कामगिरी केली आहे. दाेन्ही घटकांत उस्मानाबादला सर्वाेत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून बहुमान मिळाला. साेबतच वाशी आणि लाेहारा या दाेन्ही पंचायत समित्यांनी क्रमांक पटकाविला. पारगा व धानुरी याही ग्रामपंचायती सर्वाेत्कृष्ट ठरल्या आहेत. ही बाब आम्हा सर्वांचा उत्साह वाढविणारी आहे. भविष्यातही याहीपेक्षा अधिक गतीने काम करण्याचा प्रयत्न राहील.
-राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.