वाशी (जि. धाराशिव) : माझे प्राण गेले तरी बेहत्तर; पण, आरक्षणाच्या या लढ्यातून इंचभरही मागे हटणार नाही. सरकारने २४ डिसेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे. तोपर्यंत सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याचे निश्चित झाले पाहिजे. अन्यथा, लागलीच राज्यभरातून अडीच कोटी मराठा मुंबई पाहायला येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी रात्री वाशी येथील सभेतून दिला.
मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वातील आंदोलनाची सुरुवात धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात झालेल्या सभेने करण्यात आली. तब्बल साडेआठ तास उशीर झाला तरी या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हजर राहिले. साडेसात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मागच्या सत्तर वर्षांत मराठा समाजाने विविध पक्षांतील नेत्यांना मतदान करून मोठे केले. मात्र, त्यांनी त्यांच्या घरातील तिसरी पिढी आता राजकारणात आणून परिवार मोठा केला. मराठा समाजासाठी कोणी काहीच नाही केले. पण, आता हक्कासाठी सुरू झालेला लढा थांबणार नाही. आपण आरक्षणाशिवाय इंचभरही मागे हटणार नाही. सरकारने २४ डिसेंबरपर्यंत वेळ मागून घेतला आहे. या तारखेची वाट न पाहता १ डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.
उशीर होऊनही गर्दी कायमवाशी येथील सभा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. मात्र, वाशीला येईपर्यंत जागोजागी सत्कार व इतर कार्यक्रमांत अडकून पडावे लागल्याने मनोज जरांगे पाटील यांना वाशीत पोहोचायला सायंकाळचे साडेसात वाजले. साडेआठ तास उशीर झाला तरी मराठा बांधव सभास्थळावरून हलले नाहीत.