उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. जिल्हाभरात जवळपास ९ हजार ७९६ जणांनी अर्ज दाखल करून षड्डू ठोकण्याचा इरादा पक्का केला होता; मात्र आखाड्यात उतरण्यापूर्वीच जवळपास दीडशे इच्छुकांचे अर्ज बाद झाल्याने ते आखाड्याबाहेर फेकले गेले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरची मुदत देण्यात आली होती; मात्र अर्ज ऑनलाइन भरण्यात अडचणी आल्याने २९ तारखेपर्यंत केवळ २ हजार ३०२ अर्ज दाखल झाले होते. अडचणी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याला शेवटच्या दिवशी मुभा दिल्याने या एकाच दिवशी तब्ब्ल ७ हजार ६४५ अर्ज दाखल झाले. मुदतीत एकूण ९ हजार ९४७ अर्ज दाखल करण्यात आले. या अर्जांची छाननी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. अर्जांची संख्या जास्त असल्याने वेळ लागला. छाननीअंती एकूण प्राप्त अर्जांपैकी १५१ अर्ज अवैध ठरले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे, स्वाक्षऱ्या नसणे, अर्ज परिपूर्ण न भरणे अशा कारणांमुळे हे अर्ज अवैध ठरले आहेत. प्राप्त अर्जांचा विचार करता अवैध ठरलेल्या अर्जांची संख्या ही किरकोळ आहे. त्यामुळे अनेकांनी संपूर्ण तयारी करून आखाड्यात उतरण्याचा निर्धार केल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येते.
आता माघारीसाठी एकच दिवस...
अर्जांची छाननी झाल्यानंतर वैध ठरलेल्या उमेदवारांना माघारीसाठी १ ते ४ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे; मात्र शुक्रवारचा एकच दिवस कामकाजाचा राहिला. यानंतर शनिवार व रविवारची शासकीय सुटी असल्याने उमेदवारांना माघार घेता येणार नाही. त्यामुळे सोमवारचा एकच दिवस आता शिल्लक राहिला आहे. यापुढील दोन दिवसांत आता माघारीसाठी मनधरण्या कराव्या लागणार आहेत.
अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी...
उस्मानाबाद तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीतील ६०२ जागांसाठी १७८४ अर्ज आले होते. त्यातील ४२ अवैध ठरले.
तुळजापूर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या ४६१ जागांसाठी १२१८ अर्ज आले होते. त्यातील ४ अवैध ठरले.
उमरगा तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या ४५३ जागांसाठी १२७० अर्ज आले होते. त्यातील २८ अवैध ठरले.
लोहारा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या ८४ जागांसाठी ४९४ अर्ज आले होते. त्यातील ४ अवैध ठरले.
कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या ४९५ जागांसाठी १३५५ अर्ज आले होते. त्यातील १६ अवैध ठरले.
वाशी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या २८८ जागांसाठी ७४९ अर्ज आले होते. त्यातील ६ अवैध ठरले.
भूम तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या ५६५ जागांसाठी १४२१ अर्ज आले होते. त्यातील २७ अवैध ठरले.
परंडा तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ५६६ जागांसाठी १६५६ अर्ज आले होते. त्यातील २४ अवैध ठरले.