येरमाळा : येरमाळा येथील रहिवासी व सध्या अमेरिकेत एका कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेले डॉ. बालाजी आगलावे यांनी येरमाळा व परिसरातील रुग्णांसाठी मागील महिन्यात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. यापाठोपाठ गुरुवारी त्यांनी १० बायपॅप मशीन देऊन मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे.
डॉ. बालाजी आगलावे यांच्यासह डॉ. नीरव पटेल, डॉ. पंकज आंधळे व डॉ. अशोक पटेल यांनी एकत्र येऊन ब्रीद इंडिया फंड अंतर्गत स्वत: डोनेशन स्वरूपामध्ये निधी जमा करून आपल्या जन्मभूमीतील रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन पाठविल्या होत्या. यामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा होत आहे. यानंतर या चौघांसोबतच अमेरिकेतील अन्य काही मित्र व मराठी मंडळाच्या सदस्यांनी आता दहा बायपॅप मशीन देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. या मशीनचे लोकार्पण कृषी आधार बहुउद्देशीय फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सदस्य प्रसाद आगलावे, सतीश आगलावे, सूर्यकांत बेदरे, सिंधुताई आगलावे, कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे, कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. जीवन वायदंडे, सरपंच तब्बसूम सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. या दहापैकी दोन मशीन कळंब उपजिल्हा रुग्णालयास देण्यात आली.
यावेळी विजय देशमुख, अमोल पाटील, संतोष तौर, राहुल पाटील, सचिन पाटील, क्लासमेंट ग्रुपचे सदस्य, वाय. सी. सी. मित्रमंडळाचे सदस्य, आदी उपस्थित होते. प्रसाद आगलावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, तर गणेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. श्रीपाद पांगारकर यांनी आभार मानले.