लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा साठा करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत. याच अनुषंगाने जिल्ह्यातील उद्योगांकडे असलेले ऑक्सिजन सिलिंडर्सही ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. रविवारीही दिवसभरात विविध उद्योजकांकडून सिलिंडर्स ताब्यात घेऊन ते शासकीय रुग्णालयांना सुपूर्द करण्यात आले.
सध्या जिल्ह्यात जवळपास १४ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी होऊ लागली आहे. त्या तुलनेत ऑक्सिजनचा साठा करण्याची यंत्रणा तोकडी आहे. जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा कार्यान्वित झाल्याने हा भार काहीसा कमी झाला असला, तरी ग्रामीण भागात सिलिंडर्सचा तुटवडा आहे. रुग्णसंख्येतील वाढ अशीच राहिल्यास ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसेल. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात असलेल्या ठिकठिकाणच्या साखर उद्योगांकडून तसेच इतरही औद्योगिक आस्थापनांकडून सिलिंडर्स ताब्यात घेण्याची मोहीम सध्या सुरु आहे. या अंतर्गत मुरुमच्या विठ्ठलसाई कारखान्याने १५ सिलिंडर्स देऊ केले आहेत. पाडोळीच्या रुपामाता कारखान्यानेही १० सिलिंडर्स दिले आहेत. उस्मानाबादच्या एमआयडीसीतील अजय पॉलिमर्सने २१ तर सारडा इंडस्ट्रीजने ३ सिलिंडर्स दिले. हे सिलिंडर्स जिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यात येत आहेत. मंगरुळच्या कंचेश्वर कारखान्याने ६ सिलिंडर्स तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी देऊ केले आहेत. उमरगा तालुक्यातील बहुतांश उद्योगांनी यापूर्वीच सुमारे ३०० सिलिंडर्स गॅस एजन्सीकडे जमा केले आहेत. कळंब तालुक्यातील धाराशिव शुगर्सने १५ सिलिंडर्स उस्मानाबादेतील जंबो कोविड सेंटरसाठी देऊ केले आहेत. श्रद्धा ट्रेडर्सकडून २० सिलिंडर्स मिळाले असून, ते उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले आहेत. दरम्यान, ही मोहीम आणखी काही दिवस सुरुच राहणार असून, जेथून सिलिंडर्स उपलब्ध होतील, तेथून ते एकत्र करुन रुग्णालयांना साठा करण्यासाठी पुरविण्यात येणार आहेत. यामुळे सिलिंडर्सअभावी निर्माण होणारा ऑक्सिजनचा ताण कमी होण्यास हातभार लागणार आहे.