तुळजापूर : शहरातील श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाच्या वतीने गरजू पुजाऱ्यांना दोन हजार रुपये किमतीपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य वाटप करण्याचा निर्णय कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी दिली.
श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळ कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पार पडली. या बैठकीत मंदिर दीड महिन्यापासून बंद असल्याने पुजारीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. मंदिर हेच त्यांचे उपजीविकेचे साधन असल्याने यातून त्यांना सावरण्यासाठी पुजारी मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात गहू, तांदूळ, तूरडाळ, बेसन, तेल, साखर, चहापुडा, तिखट, मीठ, साबण, पेस्ट व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश राहणार आहे. यासाठी संबंधित पुजाऱ्यांना मंडळाकडे लेखी स्वरूपात मागणी अर्ज करावा लागणार आहे. ज्यांनी लेखी मागणी अर्ज केला आहे त्यांना वरीलप्रमाणे दोन हजार रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूचे किट देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी सांगितले.
या बैठकीस उपाध्यक्ष बिपिन शिंदे, कोषाध्यक्ष किरण क्षीरसागर, सचिव नागेश साळुंके, प्रा. धनंजय लोंढे, शांताराम पेंदे, लालासाहेब मगर, अविनाश गंगणे, अजित क्षीरसागर, नरेश अमृतराव, योगेश रोचकरी, सुधीर रोचकरी, शिवाजी बोधले, विकास खपले, सुदर्शन झाडपिडे, भारत कदम, संभाजी भांजी, सुजय हंगरगेकर आदी उपस्थित होते.
लसीकरणाचाही घेतला निर्णय
शासकीय स्तरावर पत्रव्यवहार करून लसीकरणासंदर्भात पुजारीवर्गात जनजागृती करून पुजारी बांधवांना लसीकरण करण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यासाठी विशेष बाब म्हणून लसीकरणासाठी पुजारी मंडळाचे मंगल कार्यालय तसेच बसण्यासाठी खुर्च्या, पिण्यासाठी पाणी, वैद्यकीय आरोग्य सेवकांना आवश्यक सेवा सुविधा याठिकाणी मंडळाच्यावतीने मोफत देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामुळे आगामी जून महिन्यातील पावसाळ्यात सध्याच्या लसीकरण केंद्रावरील असणारी गैरसोय या मंगल कार्यालयामुळे दूर होण्यास मदत होईल, असे उपाध्यक्ष बिपीन शिंदे यांनी सांगितले.