उस्मानाबाद : स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांत मागील काही वर्षांत नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी कोट्यवधींचे अनुदान वाटप करण्यात आले. अनेक गावे पाणंदमुक्त म्हणून घोषितही झाली. परंतु, अजूनही बहुतांश नागरिक उघड्यावर शौचास जात असून त्यांच्याविरुध्द कारवाईसाठी प्रशासनाने पुन्हा गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित केले आहे. या पथकाच्या माध्यमातून सध्या उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन समज दिली जात असून, यापुढील काळात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
तेरमधील ५३ जणांना दिले पुष्प
तेर : येथील नागरिकांना मागील पाच-सहा वर्षांत स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून दीड कोटीपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. असे असतानाही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणी व सहकाऱ्यांनी मोहीम राबविली. यावेळी ५३ जणांना पुष्प देऊन उघड्यावर न जाण्याबाबत समज देण्यात आली. तसेच यापुढील काळात उघड्यावर शौचास गेल्यास कारवाई व दंड वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना यावेळी दिले. या पथकात विस्तार अधिकारी शंकर भांगे, ग्रामसेवक प्रशांत नाईकवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ता, अंगणवाडीसेविका, मदतनीस आदी पथकात सहभागी होते.
उंडरगावात कारवाई
लोहारा : लोहारा तालुका हा हागणदारीमुक्त असतानाही अनेक गावांमध्ये नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील नागराळ (लो) व उंडरगाव येथे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना गुड मॉर्निग पथकाकडून फूल देऊ गांधीगिरी करण्यात आली. पथकात पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. आय. मुळे, ग्रामसेवक पी. डी. शिनगारे, जी. एम. पाटील यांचा समावेश होता.
तामलवाडीत १५ जणांना पकडले
तामलवाडी : येथे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या उपस्थितीत गुरुवारी १५ जणांना गुड मॉर्निग पथकाने पहाटे रंगेहाथ पकडून समज देऊन सोडले. यावेळी रियाज शेख, रोडे, ग्रामविकास अधिकारी प्रदीप लाठकर, श्रीकांत गायकवाड, शिवाजी माळी, दस्तगीर पटेल, रहेमान बेगडे, भारत रणसुरे आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.