परंडा : कोरोनाचे संकट कायम असताना आता व्हायरल सर्दी-तापाने तालुकावासीय त्रस्त आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
मागील काही दिवसांत वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. साधारणपणे थंडी, ताप, खोकला यासोबतच अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आदी लक्षणे दिसून येत आहेत. तसेच नाक गळणे, चोंदणे अशीही लक्षणे वाढीस लागली आहेत. सध्या येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये सर्दी, खोकला, ताप अशा व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढलेली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील वार्ड फुल्ल झाले असून, शहरातील खाजगी रुग्णालयात देखील वायरल इन्फेक्शनने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.
चौकट....
ही घ्या काळजी......
सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी मुलांना पावसात भिजू देऊ नका. हाताच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा. आहारामध्ये भाज्या, फळे, मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा. सध्या डेंग्यूची साथ ही आपल्या दारापर्यंत येऊन पोचली असल्याने अंग झाकेल असे कपडे घाला. दिवसा व रात्री मच्छरदाणीचा वापर करा. पाणी साचून राहणार नाही याची देखील काळजी घ्या.
- डॉ जहूर सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी, परंडा
कोट....
कोरोना रुग्णांच्या तुलनेत सध्या व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढलेले आहेत. यामध्ये सर्दी, खोकला तापाची लक्षणे आढळून येत आहेत. लहान मुलांमध्ये व्हायरल तापाची साथ वाढल्याचे पाहावयास मिळते. परंतु, ताप आला म्हणजे कोरोना आहेच, असे नाही. योग्य आजाराचे निदान झाल्यास शंकाकुशंकाना स्थान राहत नाही. लहान मुलांच्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःहून औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- डॉ. सचिन मोरे, बालरोगतज्ज्ञ, परंडा
090921\psx_20210909_122758.jpg
मुलांमध्ये व्हायरल सर्दी-तापाची साथ वाढली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात रुग्णांच्या गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.