विजय माने
परंडा : कोरोना संकटामुळे शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शासनातर्फे जमा करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे आवश्यक केले आहे. सध्या पालक विद्यार्थ्यांना घेऊन बँकेत खाते काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, बँकांनी विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. परिणामी पालकांना आपली मजुरी सोडून या कामात गुंतून राहावे लागत आहे. जमापेक्षा खर्च जास्त, अशीच काहीशी अवस्था या पोषण आहाराबाबत झाल्याच्या प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत आहेत.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच शालेय पोषण आहाराची रक्कम जमा करण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५० ते १६० रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २५० रुपयांपर्यंत ही रक्कम मिळणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते काढणे अनिवार्य आहे. मात्र बँक खाते काढण्यासाठी पॅनकार्ड आणण्यासंदर्भात बँकाकडून सक्ती केली जात आहे. काही पालक हे पॅनकार्ड काढून आणत आहेत. परंतु, यात विद्यार्थ्यांचा फोटो नसल्यामुळे बँकेकडून पुन्हा शाळेचे बोनाफाईड, आयकार्ड, आधार कार्ड, अधिक कागदपत्र मागितले जात आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्र गोळा करताना पालकांची मात्र दमछाक होत आहे.
विद्यार्थी संख्या
उर्दूच्या शाळेसह
१६७७८
---------------------
पहिली.....२२०१
दुसरी......२१६४
तिसरी.....२२०३
चौथी.......२०५०
पाचवी.....२१५५
सहावी.....१९५०
सातवी.....१९४१
आठवी.....२००९
कोट....
शालेय पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी शाळांकडून बँकेचे पासबुक काढण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र, बँक पॅनकार्ड आणल्याशिवाय पासबूक काढून देण्यास तयार नाही. विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड काढण्यासाठी अतिरिक्त खर्च होत असून, मजुरीही बुडत आहे. १५० रुपयांसाठी बँक खाते काढणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे शासनाने पालकांच्या खात्यातच पोषण आहाराची रक्कम जमा करावी.
- किरण शिंदे, पालक
कोट.....
शिक्षक विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्यासाठी सांगत आहेत. यामुळे आम्ही कामधंदे सोडून बँकेत जाऊन खाते काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकवाले विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड आणायला सांगत आहेत. त्यामुळे पालकांचा नाईलाज होत आहे. शासन आणि बँकेच्या नियमामुळे पालकांचे मोठे हाल होत आहेत.
- शरीफ तांबोळी, पालक