उस्मानाबाद : जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने वृक्ष लागवड होत आहे आणि काही गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यामागे गावकऱ्यांचा सहभाग हाच या यशाचा आधारस्तंभ असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी म्हटले.
वाशी तालुक्यातील पारगाव, दहीफळ, येसवंडी, तेरखेडा, सरमकुंडी तसेच उस्मानाबाद तालुक्यातील आळणी या गावांना भेट देऊन वृक्ष लागवडीची व नियोजनाची पाहणी केली. हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड होण्यामागे जिल्हा प्रशासनाबरोबर मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची व आशादायी असणारी आहे, असे फड म्हणाले. यावेळी नागरिकांनी आम्ही लोकसंख्येच्या तीन पट वृक्ष लावून जगवण्याची हमीही दिली.
डॉ. फड यांच्यासोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, गटविकास अधिकारी खिल्लारे, समृद्धी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, उप -अभियंता, ग्रामसेवक, सरपंच, उप-सरपंच आदी उपस्थित होते.