गोळी कानाच्या बाजूनं गेली, म्हणून माझं...! दादांसमोर पाशा पटेलांचं जोरदार भाषण; दुबईच्या पावसाचंही जोडलं कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:09 PM2024-04-19T18:09:21+5:302024-04-19T18:12:06+5:30
"अजित दादांनी जेव्हा राष्ट्रवादी पहिल्यांदा 1999 ला स्थापन केली, तेव्हा लातूरचा खडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी दादा. तेव्हा दादांनी मला लोकसभेचं उमेदवार केलं."
आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पहिल्या फेरीचे मतदान सुरू आहे. तर उर्वरित भागात नेते मंडळींचा जोरदार प्रचारही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिवमध्ये होते. यावेळी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी जोरदार भाषण केले. राष्ट्रवादीची 1999 ला स्थापन झाली, तेव्हा लातूरचा खडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी होतो. तेव्हा दादांनी मला लोकसभेचं उमेदवार केलं. गोळी कानाच्या बाजूनं गेली. म्हणून माझं हुकलं. असे म्हणत त्यांनी अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहनही केले.
पाशा पटेल म्हणाले, "अजित दादांनी जेव्हा राष्ट्रवादी पहिल्यांदा 1999 ला स्थापन केली, तेव्हा लातूरचा खडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी दादा. तेव्हा दादांनी मला लोकसभेचं उमेदवार केलं. गोळी कानाच्या बाजूनं गेली, म्हणून माझं हुकलं. परंतू हुकलं तरी मला वाइट वाटलं नाही. का? तर दादा पुन्हा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि मला महाराष्ट्राच्या कृषी मुल्य आयोगाचा अध्यक्ष केलं. नुसतं अध्यक्ष केलं नाही. तर मी निवडून न येताही दादांनी मला कॅबिनेटचा दर्जा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, आपले काही प्रश्न राहिलेले आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा, हे मिळून देशाचे आणि राज्याचे भले करणारे आहेत. याचा माझ्या मनात अजिबात संशय नाही."
"तुम्ही सर्वांनी टीव्ही बघितले असतील. काय झालं माहीत आहे का? अरे, दुबईमध्ये कधीच पाऊस पडत नाही. काल एवढा पाऊस पडला, की दुबई पाण्यात बुडून गेली. दुबईचं नाव डुबई झालं. दोन वर्ष पडणारा पाऊस एका दिवसात पडला आहे. हे जगामध्ये मानव जातीवर आलेलं संकट आहे. हे संकट तुम्हाला कळणार नाही. पण हे संकट जर टाळायचं असेल तर जगात पहिले राज्य आहे महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांनी पर्यावरणाच्या बाबतीत विचार करायचं ठरवलं आहे. एवढेच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण जगाला दिशा देण्यासाठी एक टास्कफोर्स तयार केला आहे आणि त्याचा अध्यक्षही मलाच केले आहे," असेही पटेल म्हणाले.
"आज कुठला मुस्लीम नेतासुद्धा मुस्लिमांच्या भल्यासाठी बोलत नाही. पण एकदम शंभर टक्के माझ्या मनातून सांगतो, की मुस्लिमांचेही प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवले पाहीजेत? याच्यासाठी विचार करणारा एक नेता, अजित दादांसारखा खंबीर नेता आपल्याला सापडला आहे. म्हणून दीन-दलित-शेतकरी या सर्वांचा विचार करण्यासाठी हे सरकार काम करत आहे. अरे आईला जशा आपलया मुलाच्या सर्व गोष्टी कळतात, तसे सर्व समाजाचे प्रश्न कळण्याची धमक अजित दादांमध्ये आहे," असेही पाशा पटेल यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अर्चनापाटील यांनी निवडून देण्याचेही आवाहन केले.