उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात जुनोनी येथील एकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला़ यानंतर संतप्त जमाव जिल्हा रुग्णालयावर चाल करून गेला़ पोलिसांनी तातडीने रुग्णालय गाठून जमावाला शांत केले़ या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील उपचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी येथील एक ५० वर्षीय व्यक्ती उस्मानाबाद श्हरातील जुना बस डेपो भागात वास्तव्यास आहेत़ काही दिवसांपूर्वी लक्षणे दिसून आल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथे त्यांचा गुरुवारीच स्वॅब पाठविण्यात आला़ दरम्यान, त्यांच्यावर कोविड वार्डात उपचार सुरु होते़ अहवाल येण्यापूर्वीच शुक्रवारी रुग्णालयातच मृत्यू झाला़ मयताच्या नातेवाईकांनी ही बाब त्यांच्या नातेवाईकांना कळविली़ उपचाराची गरज होती तेव्हा एकही डॉक्टर याठिकाणी उपस्थित नव्हते, असा आरोप त्यांनी केला़ त्यामुळे संतप्त झालेले शेकडो नागरिक जिल्हा रुग्णालयात धावून आले़
रुग्णास आॅक्सिजनची गरज असताना त्यांना ते पुरविण्यात आले नाही़ स्थिती गंभीर झाल्यानंतर डॉक्टरांचा शोध घेतला असता, ड्युटीवरील डॉक्टर याठिकाणी हजर नव्हते़ कर्मचाऱ्यांकडूनही कोणती मदत झाली नसल्याचा आरोप हे नातेवाईक करीत होते़ गोंधळ वाढण्यापूर्वीच पोलीस उपाधीक्षक मोतीचंद राठोड यांच्यासह शहर ठाण्याचे पथक हजर झाले़ त्यांनी नातेवाईकांना शांत केले़ रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात देण्याविषयी प्रक्रिया सुरु होती़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़राज गलांडे यांचा भ्रमनध्वनी बंद होता़ अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ़ डीक़े़ पाटील यांचाही संपर्क होऊ शकला नाही़
डॉक्टर हजर नसल्याचा आरोप जुनोनी येथील रुग्णावर उपचार झाले नसल्याने व वार्डात डॉक्टर हजर नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे़ जमावाला रीतसर तक्रार करण्यास सांगितले आहे़ यानंतर सर्वजण शांत झाले.- मोतीचंद राठोड, पोलीस उपाधीक्षक, उस्मानाबाद