उस्मानाबाद : माजी खासदार नाना पटोले यांनी पर्दाफाश यात्रेतून केलेल्या ‘मातोश्रीवर तिकिटाच्या अधिभाराचे दररोज ६७ लाख रुपये जातात’ या आरोपावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी उस्मानाबादेत जोरदार पलटवार केला़ बावळट, मूर्ख अशा शब्दांत हेटाळणी करीत त्यांनी त्या रकमेचा येथे हिशोबच दिला़
मंत्री दिवाकर रावते हे बस स्थानकाच्या पुनर्बांधणी भूमीपूजन सोहळ्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते़ यावेळी बोलताना त्यांनी पटोलेंचा आरोपांचा समाचार घेतला़ ते म्हणाले, कुणीतरी आला होता तो बावळट अमरावतीतूऩ म्हणे, तिकिटाच्या अधिभाराचे पैैसे दररोज मातोश्रीवर जातात़ केवळ त्या योजनेला स्व़बाळासाहेबांचे नाव दिल्याने हा पोटशूळ आहे़ माहिती घ्यायची नाही अन् बरळत सुटायचे़ लोक कसे निवडून देतात, अशा मुर्खांना काय माहित? असा टोला लगावतानाच त्यांनी या अधिभाराच्या रकमेतून आतापर्यंत एसटी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी १० लाख याप्रमाणे सुमारे १२४ ते १२५ कोटी रुपयांची मदत दिली आहे़ या रकमेसाठी स्वतंत्र ट्रस्ट केला आहे़ त्यावर अधिकारी आहेत़ प्रत्येक पैैश्याचा हिशोब ठेवला जातो़ यातून मुलींना मोफत पास तसेच इतरही अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचे रावते म्हणाले़