लोहारा : एफआरपीनुसार ऊस बिलाची रक्कम वेळेत न देणाऱ्या, एकाच हंगामात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमेत हप्ता दिलेल्या लोकमंगल माऊली कारखान्याने एफआरपी अधिक १५ टक्के व्याजासह संपूर्ण बिल तात्काळ द्यावे, अशी मागणी साखर आयुक्त यांच्याकडे मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांनी केली आहे.
तहसीलदार संतोष रुईकर यांच्यामार्फत साखर आयुक्त यांना पाठविलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याला अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस दिला होता. सदरील कारखान्याने सुरुवातीला प्रति मेट्रिक टन दोन हजार १०० रुपये तर काही शेतकऱ्यांना १ हजार रुपयेप्रमाणे बिले अदा केली आहेत. शासन परिपत्रकानुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आल्यानंतर १४ दिवसांच्या आत खात्यावर बिल जमा करणे बंधनकारक आहे. परंतु लोकमंगल कारखान्याने जानेवारी व फेब्रुवारी २०२१ ची बिले अद्याप दिलेली नाहीत. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरिपाचे खत व बियाणे खरेदीसाठी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यातच एकाच सिझनमध्ये वेगवेगळे दर देऊन लोकमंगल साखर कारखान्याने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी नियमानुसार दोन हजार शंभर रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. त्यामुळे आता ‘लाेकमंगल’ने एफआरपी अधिक १५ टक्के व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.