शहर नामांतराच्या 'त्या' सूचनापत्रांवर याचिका करा; उच्च न्यायालयाचे याचिकाकर्त्यांना निर्देश
By चेतनकुमार धनुरे | Published: February 27, 2023 06:24 PM2023-02-27T18:24:14+5:302023-02-27T18:24:44+5:30
धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत.
धाराशिव : शहरांच्या नामांतराला विरोध असलेल्या याचिकांवर सोमवारी मुंबई खंडपीठात सुनावणी घेण्यात आली; मात्र तत्पूर्वीच केंद्र व राज्य शासनाने नामांतरांचे सूचनाप्रसिद्ध केलेले असल्याने आता याचिकाकर्त्यांना या सूचनापत्रांच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर २७ मार्च रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती धाराशिवचे याचिकाकर्ते खलील सय्यद यांनी दिली.
धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर शहरांच्या नामांतराला विरोध असणाऱ्या सुमारे ९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी धाराशिव शहरात या नामांतराच्या विरोधात कृती समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून निवेदने, आंदोलने झाली. नंतर काँग्रेसचे पदाधिकारी खलील सय्यद यांनी नामांतरविरोधी याचिकाही दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सर्वच याचिकांवर एकत्रित सोमवारी सुनावणी ठेवण्यात आली होती.
दरम्यान, केंद्र व राज्य शासनाने तत्पूर्वीच दोन्ही शहरांच्या नामांतराचे नोटिफिकेशन प्रकाशित केले आहे. शिवाय, सरकार पक्षाकडून सोमवारी सुनावणीवेळी शपथपत्रही सादर करण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आता या नोटिफिकेशनच्या विरोधात याचिका दाखल करण्याच्या सूचना केल्या. याअनुषंगाने पुढील तयारी सुरू असल्याचे याचिकाकर्ते खलील सय्यद यांनी सांगितले.