उस्मानाबाद -सध्या सत्तेत असलेल्या केंद्रातील भाजपाने तत्कालीन काँग्रेस सरकारला इंधन दरवाढीवरून धारेवर धरत आंदाेलनाच्या माध्यमातून रान उठविले हाेते. इंधन दरवाढीला सरकारचे धाेरणच जबाबदार असल्याचे घणाघाती आराेप केले जात हाेते. मात्र, आराेपकर्त्या भाजप पक्षाच्या हाती सध्या केंद्रातील सत्तेच्या चाव्या आहेत. असे असतानाही मागील काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ हाेत आहे. मे महिन्याच्या अखेरीस तर उस्मानाबादेत पेट्राेलच्या दराने शंभरी पार केली. तर डिझेलनेही नव्वदी ओलांडली आहे. महिनाभरात साधारपणे पावणेतीन ते तीन रुपयांनी दरामध्ये वाढ झाल्याने महागाईचे चटकेही अधिक तीव्र हाेऊ लागले आहेत.
सत्तेत येताच इंधनाचे दर आवाक्यात आणू, अशा वल्गना सध्याच्या केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी केल्या हाेत्या. परंतु, सत्तेची जवळपास सात वर्ष लाेटत आली असतानाही इंधनाचे दर काही आवाक्यात आणता आले नाहीत. उलट दिवसागणिक दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे शेतकरी, कामगारांसह सर्वसामान्यांना दुचाकी वापरणेही कठीण झाले आहे. एवढेच नाही तर इंधन भडकल्याने वाहतूक खर्चात भर पडली. परिणामी जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ हाेत चालली आहे. त्यामुळे सर्वासामान्य लाेक मेटाकुटीला आले आहेत. एकट्या मे महिन्यात पेट्राेलच्या दरामध्ये सुमारे २.९२ पैसे म्हणजेच जवळपास तीन रुपयांनी वाढ झाली आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात तर दर अधिक गतीने वाढू लागले आहेत. मे महिना उजाडताच पेट्राेलचा दर ९७.३५ पैसे झाला. यानंतर मात्र दरामध्ये सातत्याने वाढ हाेत गेली. १८ मे राेजी तर पेट्राेल ९९.७० पैशांवर जाऊन ठेपले. हा दर २० मे पर्यंत कायम राहिला. २१ मे राेजी यात पुन्हा १९ पैशांची वाढ हाेऊन दर ९९.८९ पैसे झाला. सदरील दर २२ मे राेजी कायम राहिला. २३ मे राेजी मात्र, पेट्राेलने आजवरचा उच्चांक गाठत शंभरी पार केली. या दिवशीचा दर १०० रुपये ५ पैसे एवढा हाेता. यानंतर २५ मे राेजी दरामध्ये आणखी २२ पैशांनी वाढ हाेऊन पेट्राेल १०० रुपये २७ पैशांवर पाेहाेचले. इंधन दरवाढीचा हा आलेख लक्षात घेता, शासनाने दरवाढ कमी करण्याच्या अनुषंगाने तातडीने पाऊले उचलण्याची गरज व्यक्त हाेऊ लागले आहे.
चाैकट...
डिझेल पावणेचार रुपयांनी महागले
एकीकडे पेट्राेलचे दर वाढत असताना दुसरीकडे डिझेलही काही मागे राहिलेले नाही. डिझेलच्या दरातही झपाट्याने वाढ हाेत आहे. एकट्या मे महिन्यात डिझेल ३ रुपये ७२ पैशांनी महागले आहे. १ मे राेजी डिझेलचा प्रति लीटर दर ८७ रुपये एवढा हाेता. या दरामध्ये यानंतर सातत्याने वाढ हाेत गेली. १७ मे राेजी डिझेल ८९.५८ रुपये दराने विक्री हाेत हाेते. १८ मे राेजी हा दर ८९ रुपये ८८ पैसे हाेता. २६ मे राेजी दर डिझेलच्या दराने चक्क नव्वदी ओलांडली. दर ९०.७२ पैसे एवढा झाला. हा आजवरचा उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात आले.
जनतेने जगावे तरी कसे?
दरवाढ केवळ इंधनापुरतीच मर्यादित राहत नाही. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंसाेबतच अन्य सेवांच्या दरावरही हाेत आहे. डिझेल महागल्याने ट्रॅक्टरद्वारे केली जाणारी शेतीची मशागतही महागली आहे. गतवर्षी १ एकर शेतीच्या नांगरणीसाठी ट्रॅक्टरधारक प्रति एकर ११०० ते १२०० रुपये आकारत हाेते. यंदा हा दर १६०० ते १८०० रुपये केला आहे. वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचे दरही सातत्याने वाढत आहेत. याचा थेट परिणाम जनतेवर हाेत आहे. काेराेनामुळे अर्थकारण काेलमडून पडले असतानाच दुसरीकडे दरवाढीचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.
दृष्टिक्षेपात इंधन दरवाढ
पेट्राेल
९७.३५ पैसे
१ मे २०२१
१००.२७ पैसे
२६ मे २०२१
डिझेल
८७.०० पैसे
१मे २०२०
९०.७२ पैसे
२६ मे २०२१