तामलवाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्गाने कहर केला. त्यात अनेकांना जीवदेखील गमवावा लागला. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) या गावाचा तर दुसऱ्या लाटेत रेड झोनमध्ये समावेश झाला होता. परंतु, तेथील ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व गावकऱ्यांनी विविध उपाययोजना राबवून महिनाभरात गावाला कोरोनामुक्त करण्यात यश मिळविले आहे.
तामलवाडी पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाच किमी अंतरावर पिंपळा (बु.) गाव असून, येथे साडेतीनशे कुटुंब राहतात. येथे पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकूण २३ रुग्ण आढळून आले असून, यातील तिघांचा या आजाराने बळी घेतला. त्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण होते. महसूल प्रशासनाने या गावाचा समावेश रेड झोनमध्ये केला होता. अशा स्थितीत ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी एकीचे बळ दाखवत गृहभेटी, रॅपिड टेस्ट शिबिर, फवारणी यांसारख्या उपाययोजना केल्या. तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर, कुटुंबनिहाय ऑक्सिजन व शारीरिक तपासणी करून जनजागृती केली. यामुळे महिनाभरात कोरोना विषाणू गावातून हद्दपार झाला.
आता मागील महिनाभरापासून गावात एकही कोरोना बाधित आढळून आला नाही. याकामी सरपंच गीताताई वाघमोडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामसेवक दिगंबर कांबळे, पोलीसपाटील महादेव नरवडे, आरोग्य कर्मचारी जनार्दन गोप, ग्रामपंचायत सदस्य संग्राम राजेपांढरे, सोमनाथ मोरे, विशाल जाधव, योगेश गवळी, दयानंद चव्हाण, बाळू शिरसट, ग्रामपंचायत कर्मचारी पोपट सिरसट, संजय मस्के, आशा कार्यकर्ती अनिता घोतरकर, गीता चव्हाण, सुरेखा जाधव, जयश्री नरवडे, लक्ष्मी चुंगे, कोरोना वॉरियर्स मंगेश चुंगे, महादेव कोपे, महादेव गवळी, कमलाकर मंगेश जाधव, परवेज शेख, ॲड. गजानन चौगुले, जगन्नाथ गवळी, बालाजी चुंगे, शाम चौगुले, भरत घोतरकर, बीट अंमलदार संजय राठोड आदींचे योगदान मोलाचे ठरले.
चौकट......
‘माझे ग्राहक, माझी जबाबदारी’
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपळा (बु.) गावातील रेशन दुकानदार बालाजी चुंगे यांनी ‘माझे ग्राहक, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेतला. याअंतर्गत त्यांनी प्रत्येक ग्रामस्थाचे ऑक्सिमीटरने तापमान तपासले. तसेच सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केला. ३४५ कार्डधारकांना गुळवेलचा काढा उपलब्ध करून दिला. तो पिण्यासाठी जनजागृती केली. तसेच तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी गावात फवारणी करण्यासाठी हायपो रसायन उपलब्ध करून दिले.
चौकट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकदम १५ रुग्ण सापडले. त्यामुळे गावाचा समावेश रेड झोनमध्ये झाला. परंतु, गावकऱ्यानी एकजूट दाखवल्याने शिरकाव झालेला कोरोना महिनाभरात हद्दपार केला. गावात तीन वेळा जंतूनाशक फवारणी केली असून, सर्वांनीच सरकारी नियमांचे पालन केल्याने गाव कोरोनामुक्त झाला.
- गीताताई वाघमोडे,
सरपंच
३४५ कुटुंबांच्या गृहभेटी देऊन महिनाभर आरोग्य तपासणी करण्यात आली. बाधितांच्या कुटुंब व संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीसाठी गावात रॅपिड टेस्ट शिबिर घेतले. संसर्ग वाढू नये, यासाठी नियमांची अंमलबजावणी कडक केली. त्यास गावकऱ्यांनीदेखील चांगली मदत केली.
- जनार्दन गोप,
आरोग्यसेवक, देवकुरूळी